जकार्ता :भारत आणि दहा राष्ट्रांच्या ‘आसियान’ या गटादरम्यान दूरसंचार, व्यापार आणि डिजिटल परिवर्तन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी १२ कलमी प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सादर केला. यासोबतच, नियमाधारित कोविडोत्तर जागतिक व्यवस्था उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मल्टि-मोडल कनेक्टिव्हिटी आणि आग्नेय आशिया, भारत, पश्चिम आशिया व युरोप यांना जोडणाऱ्या आर्थिक मार्गिकेची उभारणी, तसेच भारताच्या डिजिटल सार्वजनिक जाळय़ाचा आसियानच्या सदस्य राष्ट्रांनाही फायदा करून देण्याची तयारी इत्यादी प्रस्ताव मोदी यांनी इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधील वार्षिक आसियान- भारत परिषदेत जाहीर केले.

हेही वाचा >>> G20 India Summit: दिल्लीत ४ हजार कोटी रुपयांचा खर्च; कुणी कशावर केला?

दहशतवाद, दहशतवादाला अर्थपुरवठा आणि सायबर अपप्रचार यांच्याविरुद्ध सामूहिक लढा देण्याबाबत आणि ‘ग्लोबल साऊथ’ला तोंड द्यावे लागणारे मुद्दे बहुपक्षीय मंचावर मांडण्याबाबत पंतप्रधानांच्या आवाहनाचा १२ कलमी प्रस्तावांमध्ये समावेश आहे.

सागरी सहकार्याबाबत एक आणि अन्न सुरक्षेबाबत दुसरे अशी दोन संयुक्त निवेदने या परिषदेत स्वीकारण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुक्त व खुल्या भारत- प्रशांत क्षेत्राच्या दिशेने प्रगती आणि जागतिक दक्षिणेचा (ग्लोबल साऊथ) आवाज उन्नत करणे हे सर्वाचे सामायिक हित आहे, असे मोदी यांनी या परिषदेत केलेल्या भाषणात सांगितले. ‘दि असोसिएशन ऑफ साऊथईस्ट एशियन नेशन्स’ (आसियान) हा या क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली गटांपैकी एक मानला जातो.