मेरठ : ‘‘विरोधी पक्ष माझ्यावर करत असलेल्या हल्ल्यांमुळे माझा भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा थांबणार नाही आणि भ्रष्टाचारात गुंतलेले लोक कुणीही असोत, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल’’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीवर हल्ला चढवला.

 ‘मोदी संपूर्ण शक्तिनिशी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत असताना या लोकांनी इंडी आघाडी स्थापन केली आहे. आपण मोदींना धमकावू शकू असे त्यांना वाटते. परंतु माझ्यासाठी माझा भारत हे माझे कुटुंब आहे आणि त्याला भ्रष्ट लोकांपासून वाचवण्यासाठी मी पावले उचलत आहे’, असे उत्तर प्रदेशातील मेरठ येथे प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील त्यांची ही पहिलीच सभा होती.

हेही वाचा >>> रामलीला मैदानावर ‘इंडिया’ची नारीशक्ती; सुनीता केजरीवाल, कल्पना सोरेन आणि सोनिया गांधी यांची उपस्थिती

 आपण भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करत असल्यामुळे काही लोक बिथरले असल्याचे मोदी यांनी सांगितले. ‘देशाला भ्रष्ट लोकांपासून वाचवण्यासाठी मी मोठी लढाई लढत आहे. त्यामुळेच ते आज गजाआड आहेत आणि सर्वोच्च न्यायालयातदेखील त्यांना जामीन मिळत नाही’, असे ते म्हणाले.

 ‘ही निवडणूक दोन गटांमधील लढाई आहे. एका बाजूला भ्रष्टाचार हटवण्यास बांधील असलेली एनडीए आहे, तर दुसऱ्या बाजूला भ्रष्ट नेत्यांचे संरक्षण करण्यावर भर देणारी इंडी आघाडी आहे. भ्रष्टाचार हटवला जावा की नाही हे तुम्हाला ठरवायचे आहे’, असे मोदी या सभेत बोलताना म्हणाले. ‘भ्रष्ट लोकांनो ऐका. तुम्ही मोदीवर कितीही हल्ले करा, हा मोदी आहे, तो थांबणार नाही. भ्रष्टाचार करणारी व्यक्ती कितीही मोठी असो, त्याच्याविरुद्ध कारवाई निश्चितच केली जाईल. ज्याने देशाला लुटले आहे, त्याला ते परत द्यावे लागेल. ही मोदीची गॅरंटी आहे’, असेही पंतप्रधानांनी सांगितले.