PM Narendra Modi Speech on Indus Water Treaty with Pakistan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केलं. तसेच भारताच्या शत्रूची चांगलीच कानउघडणी केली. काश्मीरमधील पहलगाम येथे एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार स्थगित केला आहे. यावरही मोदी यांनी टिप्पणी केली. त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला की “यापुढे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही.” याचाच अर्थ पाकिस्तान सीमेवरून भारताविरोधातील कुरापती थांबवणार नाही तोवर सिंधू जलकरार स्थगितच राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतातील नागरिकांना आता समजलं आहे की सिंधू जलकरार आपल्यासाठी किती अन्यायकारक आहे. हा करार खूपच एकतर्फी आहे. भारतात उगम पावणाऱ्या नद्यांच्या पाण्यावर आपल्या शत्रू देशातील शेतकरी पिकं काढतोय आणि माझ्या देशातील शेतकरी मात्र दुष्काळाचा सामना करतोय. माझ्या देशातील जमीन तहानलेली आहे. सात दशकांपासून त्या अन्यायकारक कराराने आमचं पाणी पळवलं. परंतु, भारत आता हे सगळं सहन करणार नाही.
सिंधू जलकराराचं ते स्वरुप आम्हाला मान्य नाही : मोदी
“सात दशकांपासून सिंधू जलकराराने आपल्या देशाचं आणि आपल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं आहे”, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. ते म्हणाले, “त्या करारामुळे आमचं पाणी शत्रूला दिलं गेलं, ज्यावर केवळ भारताचा व इथल्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे. सिंधू जलकराराचं स्वरुप हे भारताचं शोषण करणारं आहे. भारत सात दशकांपासून ते स्वरुप सहन करत आला आहे. मात्र, आता ते स्वरुप भारत स्वीकारणार नाही आणि सहनही करणार नाही. आपल्या देशाच्या व आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही हा करार नामंजूर करतो.
दहशतवादाबाबत मोदी यांचं मोठं वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आम्ही आता दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना, त्यांना आश्रय देणाऱ्यांना वेगवेगळ्या चष्म्यातून पाहणार नाही. आमच्यासाठी आता हे सगळेच लोक सारखे आहेत. शत्रू सातत्याने आपल्याला अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी देत आहे. परंतु, आम्ही असल्या धकम्यांना भिक घालत नाही. अणूबॉम्ब हल्ल्याच्या नावाखाली भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नका. तसा कारभार शत्रूने यापुढेही चालू ठेवला तर आमचं लष्कर त्या शत्रूबाबतचा निर्णय घेईल. त्या शत्रूचं काय करायचं त्याचा निर्णय लष्कर घेईल. लष्कराच्या अटी व शर्तींवर, लष्कर ठरवेल त्या पद्धतीनुसार, लष्कराने ठरवलेल्या लक्ष्याचा विचार करून आम्ही शत्रूविरोधातील मोहीम अंमलात आणणार.”