Donald Trump and Pm Modi Phone Call : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही महिन्यांत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांच्या धोरणांमध्ये प्रामुख्याने टॅरिफच्या निर्णयाची मोठी चर्चा झाली अर्थात अद्यापही सुरू आहे. आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलं. त्याचा अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसला. ट्रम्प यांनी भारतावर देखील २५ टक्के टॅरिफ लादलं. तसेच अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा ६ ऑगस्ट रोजी केली. त्यानुसार २७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून हे अतिरिक्त आयातशुल्क भारतावर लागू होणार आहे.

या संदर्भात अमेरिकेच्या होमलॅण्ड सिक्योरिटी विभागाने नोटीसही जारी केली आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या कारणावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त आयात शुल्क लादलं आहे. ट्रम्प यांच्या या आयात शुल्कामुळे भारत आणि अमेरिकामधील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये यासाठी ट्रम्प सातत्याने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भारताने आपली ठाम भूमिका घेतली असून भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकत नाहीये. या सर्व घडामोडी जवळपास दोन महिन्यांपासून सुरू आहेत.

दरम्यान, या सर्व घडामोडी सुरू असताना गेल्या काही आठवड्यांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वेळा बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास तब्बल ४ वेळा नकार दिल्याचा दावा एका जर्मन वृत्तपत्राने केला आहे. भारत आणि अमेरिका टॅरिफ वादाचं विश्लेषण करणाऱ्या फ्रँकफर्टर ऑलगेमाइन (Frankfurter Allgemeine) या जर्मन वृत्तपत्राने या संदर्भातील दावा केला आहे. मात्र, दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

फ्रँकफर्टर ऑलगेमाइनच्या दाव्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफवरून धमक्या देण्याची आणि दबाव आणण्याची नेहमीची रणनीती भारताच्या बाबतीत काम करत नाही. या वृत्तपत्राच्या दाव्यानुसार, पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास टाळणं यावरून असं दिसतं की मोदींची ट्रम्प यांच्यावरील नाराजी दिसून येते किंवा भारत आता सावधगिरीची भूमिका घेत असल्याचं यावरून सूचित होत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

भारत-अमेरिकेचे अनेक वर्षांपासूनचे संबंध डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवरून सातत्याने भारताला लक्ष्य केल्यामुळे तणावाच्या परिस्थितीत आले आहेत. तसेच रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याच्या मुद्यांवरून दंडही ठोठावण्याची धमकी दिल्यामुळे या तणावात आणखी भर पडली. दरम्यान, या जर्मन वृत्तपत्राच्या दाव्याच्या अहवालाची प्रत ग्लोबल पब्लिक पॉलिसी इन्स्टिट्यूटचे सह-संस्थापक आणि संचालक थॉर्स्टन बेनर यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट केल्याचंही वृत्तात म्हटलं आहे.