PM Narendra Modi on Donald Trump 50 Percent Tariff : भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (६ ऑगस्ट) भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादत असल्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी याआधी जाहीर केलेले २५ टक्के शुल्क लागू होण्याच्या १४ तास आधी ट्रम्प यांनी हा नवा आदेश काढला आहे. आधीच्या २५ टक्के आयात शुल्काची अंमलबजावणी आजपासून (७ ऑगस्ट) सुरू झाली आहे, तर अतिरिक्त कराची अंमलबजावणी व्हाइट हाऊसमधून आदेश निघाल्यापासून २१ दिवसांनी केली जाईल.
दरम्यान, यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मोदी यांनी ट्रम्प यांच्या अरेरावीला संयमी उत्तर दिलं आहे. मोदी म्हणाले, “भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशूपालकांच्या, मच्छिमारांच्या हिंतांबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही.” मोदी यांची ही टिप्पणी थेट वॉशिंग्टनसाठी संदेश असल्याचं मानलं जात आहे.
मोदींकडून ग्रामीण भारताच्या संरक्षणाची जबाबदारी अधोरेखित
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशूपालकांच्या, मच्छिमारांच्या हितांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. मला जाणीव आहे की यासाठी मला मोठी किंमत मोजावी लागेल. परंतु, मी त्यासाठी तयार आहे. भारत आपल्या शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या कल्याणासाठी मी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार आहे.” वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता मोदी यांनी ग्रामीण भारताच्या, खेड्यांमधील समुदायांच्या संरक्षणाच्या जबाबदारीबाबतचा सरकारचा निर्धार मोदी यांनी यावेळी अधोरेखित केला.
अन्यायकारक निर्णय : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
ट्रम्प यांनी केलेल्या अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्काच्या घोषणेनंतर भारताने अमेरिकेला ठणकावलं आहे. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचं भारताने म्हटलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत ही प्रतिक्रिया दिली आहे.
जयस्वाल म्हणाले, “इतर अनेक देशांनी स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेणं अत्यंत दुर्दैवी आहे. ही कृती अन्यायकारक व अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल.”