भारताचं ईशान्येकडील राज्य मणिपूर गेल्या तीन महिन्यांपासून धगधगतंय. मणिपूरमधली परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी गेल्या तीन महिन्यात एकदाही संसदेत या गंभीर प्रश्नावर भूमिका मांडली नाही. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला आहे. मंगळवारपासून (८ ऑगस्ट) लोकसभेत यावर चर्चा सुरू आहे. तीन दिवसांनंतर अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत येऊन अविश्वास ठरावावर उत्तर दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विरोधी पक्षांनी फिल्डिंग सेट केली आहे, पण आमच्याकडून चौकार-षटकार लागतायत, विरोधी पक्ष अविश्वास ठरावाच्या नावाखाली नो बॉलवर नो बॉल फेकत आहे आणि आमच्याकडून शतकावर शतकं लागत आहेत. नरेंद्र मोदी विरोधकांना म्हणाले, अविश्वास ठराव आणताना तुम्ही तयारी करून का येत नाही?
नरेंद्र मोदी म्हणाले, आज मी सभागृहाला एक गुपित सांगणार आहे. माझा एका गोष्टीवर विश्वास बसलाय की विरोधी पक्षाच्या लोकांकडे एक गुप्त वरदान आहे. हे लोक ज्याचं वाईट चिंततील, त्याचं चांगलंच होईल. यांनी २०१८ मध्येही अविश्वास प्रस्ताव आणला होता. परंतु, त्यानंतर आम्ही अजून मोठ्या संख्येने परत आलो. उलट यांचीच (विरोधी बाकावरील खासदार) मोजणी करायची वेळ आली.
हे ही वाचा >> “दाढी आणि कपडे पाहून त्याने…”, असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत मांडला जयपूर-मुंबई ट्रेनमधील हत्याकांडाचा मुद्दा
विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे. गेल्या तीन दिवसांत विरोधी पक्षांमधील माझ्या मित्रांनी डिक्शनरी शोधून त्यात जितके अपशब्द सापडतील, ते सगळे वापरले. त्यांच्यासाठी सर्वात आवडती घोषणा आहे मोदी तेरी कब्र खुदेगी. परंतु यांचे अपशब्दही माझ्यासाठी टॉनिक आहेत.