पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे आणि तेथील नागरिकांना मोदींविषयी असलेले कुतूहल नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नरेंद्र मोदींच्या जपान दौऱ्यातही त्याचा प्रत्यय आला. जपान दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यासोबत जपानच्या हायस्पीड बुलेट ट्रेनने प्रवास केला. मोदींनी या प्रवासाची छायाचित्रे त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर प्रसिद्ध केली आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांचे शिन-कोबे स्थानकावर आगमन झाल्यानंतर तेथील नागरिकांनी ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जयच्या’ घोषणा दिल्या. याठिकाणी उपस्थित असलेले सर्व नागरिक मोदींच्या आगमनाने खूप उत्साहित दिसत होते. नरेंद्र मोदी यांनीदेखील या नागरिकांशी आणि लहान मुलांशी संवाद साधला. या बुलेट ट्रेनचा वेग प्रतितास २४० ते ३२० कि.मी. इतका असून टोकियो ते शिंकासेन या स्थानकांदरम्यान मोदी आणि अबे यांनी हा प्रवास केला. सध्या मोदी सरकार मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर अशाचप्रकारची बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या प्रकल्पासाठी जपानी तंत्रज्ञांची मदत घेतली जात आहे.

तत्पूर्वी शुक्रवारी रत आणि जपानमध्ये ऐतिहासिक अणुकरारावर स्वाक्षरी झाली. विशेष म्हणजे, अणुबॉम्ब हल्ला झालेल्या जगातील एकमेव जपान या देशानं पहिल्यांदाच अण्विक प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या भारताबरोबर अणुकरार केला आहे. दरम्यान, अणुपुरवठादार देशांच्या समूहाची आजच व्हिएन्नामध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. त्यात भारताच्या समावेशाबाबतचा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं शुक्रवारी भारत-जपान यांच्यात नागरी अणुकरार झाल्याची माहिती दिली. डिसेंबर २०१५ मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दोन्ही देशांनी नागरी अणुकराराबाबतचा निर्णय घेतला होता. भारताने आतापर्यंत अमेरिकेसह ११ देशांसह नागरी अणुकरार केला आहे. मात्र जपानसोबत केलेला करार हा विशेष असेल. अणुउर्जा प्रकल्पांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जपानकडे असलेल्या तंत्रज्ञानाला जगभरात सर्वोत्तम मानले जाते.