राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देत आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “आम्ही ग्रामीण भागातील गरिबांसाठी चार कोटी घरं बांधली, शहरी गरिबांसाठी ८० लाख पक्की घरे बांधली. जर काँग्रेसच्या गतीने गेलो असतो तर या विकासाला १०० वर्ष लागली असती. या कामासाठी पाच पिढ्या लागल्या असत्या. १० वर्षात ४० हजार किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे इलेक्ट्रिफिकेशन झाले. जर काँग्रेसच्या वेगाने गेलो असतो तर या कामाला ८० वर्ष आणि चार पिढया लागल्या असत्या. आम्ही दहा वर्षात १७ कोटी गॅस कनेक्शन दिले, काँग्रेसच्या गतीने या कामासाठी ६० वर्ष लागले असते. तीन पिढ्या धुरात गुदमरल्या असत्या.”

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचे खूप नुकसान झाले. काँग्रेसने देशाच्या सामर्थ्यावर कधीही विश्वास ठेवला नाही. त्यांनी स्वतःला शासक मानले आणि जनतेपासून अंतर ठेवून त्यांना लहान समजले. काँग्रेसच्या देशातील नागरिकांबद्दल कसा विचार करतात याबद्दल मी बोललो तर काँग्रेसला राग येतो. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी जे सांगितले होते, ते पुन्हा वाचून दाखवतो.”

‘विरोधक दीर्घकाळ विरोधातच राहण्याच्या मानसिकतेत’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

नेहरु म्हणाले भारतीय लोक आळशी

“भारतात अधिक मेहनत करण्याची सवय नाही. आम्ही इतके काम नाही करत, जेवढे युरोप, जपान, रशिया, अमेरिका किंवा चीनमधील लोक करतात. हे समजू नका त्यांचा समाज चमत्काराने विकसित झालेला नसून मेहनत आणि हुशारीच्या बळावर विकसित झाला आहे”, म्हणजे नेहरु भारतीय नागरीकांना आळशी समजत होते. भारतीय कमी अक्कल असलेले आहेत”, असे नेहरुंचे म्हणणे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

संकट आले की भारतीय नाउमेद होतात – इंदिरा गांधी

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही विचारसरणी वेगळी नव्हती. त्यांनी लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट रोजी म्हटले होते की, दुर्दैवाने आमचे काम जेव्हा पुर्णत्वास जात असते, तेव्हा आम्ही आत्मसंतुष्ट होतो आणि जेव्हा आमच्यासमोर संकट येते, तेव्हा नाउमेद होऊन जातो. कधी कधी तर असं वाटतं की, संपूर्ण राष्ट्राने पराजय भावना स्वीकारली आहे. आजच्या काँग्रेसकडे लोकांकडे पाहिल्यावर असे वाटते, इंदिराजींनी भलेही देशातील लोकांचे आकलन चुकीचे केले असेल. पण काँग्रेसचे अतिशय अचूक असे आकलन त्यांनी केले होते, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

मी तिसऱ्या टर्ममध्येच देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविणार

आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि ही मोदीची गॅरंटी आहे. जेव्हा आम्ही जगाची तिसरी आर्थिक शक्ती बनू, असे म्हणतो. तेव्हा विरोधात बसलेले आमचे सहकारी वेगळाच वितर्क लढवतात. ते म्हणतात, याच्याच काय मोठं? हे आपोआप होईल. मी सभागृहाच्या माध्यमातून देशाला आणि विशेषकरून युवकांना सांगू इच्छितो की, अर्थव्यवस्था बळकट कशी होते आणि त्यात सरकारची भूमिका काय असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली यूपीए दोनच्या काळातील अंतरिम अर्थसंकल्पावेळी तत्कालीन अर्थमंत्र्यांनी केलेले एक विधान वाचून दाखविले. त्यावेळची भारताची अर्थव्यवस्था जगातील ११ व्या क्रमाकांवर आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी यूपीएने २०४४ चे लक्ष्य ठेवले होते. पण आम्ही तिसऱ्या टर्ममध्येच हे करून दाखविणार आहोत. जर ११ क्रमाकांवर गेल्यावर तुम्हाला त्यावेळी आनंद झाला होता, तर आज तिसऱ्या क्रमाकांवर गेल्यावरही तुम्हाला आनंद व्हायला हवा.