Narendra Modi Speak in Marathi Video : भारत आणि आखाती देशांमधील द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच कुवैतला जाऊन आले. दोन दिवसीय कुवैत दौऱ्यात त्यांनी विविध लोकांशी चर्चा केली. गल्फ स्पिक लेबर कॅम्पमधील भारतीय कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना रत्नागिरीतील एक व्यक्तीही भेटला. त्यांच्याशी मोदींनी चक्क मराठीतून संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिना अब्दुल्ला प्रदेशात असलेल्या गल्फ स्पिक लेबर कॅम्प येथे दौरा केला. यामध्ये जवळपास दीड हजार भारतीय कामगार आहेत. भारतातील विविध राज्यातील आणि शहरातील कर्मचारी तेथे कार्यरत आहेत. मोदींनी यावेळी या कर्मचाऱ्यांची, त्यांच्या प्रकृतीची, त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली.कुवैतमधील गल्फ स्पिक लेबर कॅम्पमध्ये मोदींना रत्नागिरीतील एक मजुरही भेटला.

“किती वर्षे झाली येथे?” असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी कामगाराला विचारला. कामगाराने म्हटलं, “नऊ वर्षे झाली.” त्यावर मोदींनी विचारलं, “विशेष काय मग?” त्यावर कामगार म्हणाला, “प्रगती झाली आहे. मुलीला शिकवून तिचं लग्न लावून दिलं आहे.” त्यावर मोदी म्हणाले की, “पुढे तुझी इच्छा काय आहे?” कामगार म्हणाला की, “मला मुलांना अजून पुढे शिकवायचं आहे.” कामगाराचा हा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचंड भावला. ते म्हणाले की, “हा अत्यंत चांगला विचार आहे. आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्या. थोडा त्रास होतो, पण शिक्षण दिलंच पाहिजे.”

दरम्यान, या दौऱ्यावेळी मोदी यांना कुवेतच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. भारत आणि कुवेतदरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदी यांना एखाद्या राष्ट्राकडून मिळालेला हा २०वा पुरस्कार आहे.

हेही वाचा >> PM Modi Receives Kuwait Highest Honour: PM मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च पुरस्कार, ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ देऊन केला सन्मान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ ही कुवेतमधील नाइटहूडची ऑर्डर आहे. हा पुरस्कार एखाद्या देशाचे प्रमुख आणि राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचे प्रतीक म्हणून दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार बील क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश अशा जागतिक स्तरावरील नेत्यांना देण्यात आला आहे. कुवेतमधील बायन पॅलेस येथे अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जेबर अल-सबाह यांनी मोदींना हा पुरस्कार दिला. यानंतर हा सन्मान आपण भारतीयांना आणि भारत-कुवेत मैत्रीला अर्पण करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले.