Operation Sindoor India Pakistan News Updates : “पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तान सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी देत आहेत, ते एक दिवस पाकिस्तानलाच नष्ट करून टाकेल”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी ऑपेरशन सिंदूरची माहिती देऊन पाकिस्तान आणि पाकिस्तानातील दहशतवादी कृत्यांना समर्थन देणाऱ्या इतर देशांना इशाराच दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पाकिस्तानला जर वाचायचं असेल तर त्याला दहशतवाद नष्ट करावाच लागेल. त्याशिवाय शांततेचा कोणताही मार्ग नाही. भारताचा हेतू एकदम स्पष्ट आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाही. शिवाय पाणी आणि रक्तही एकत्र नाही वाहू शकत.”
गरज पडल्यास शक्तीचा वापर करणार
“मी आज जागतिक समूहालाही सांगेन, आमचं हे धोरण राहिलं आहे. जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल, तर दहशतवादावरच होईल, पाकव्याप्त काश्मीरवरच होईल. प्रिय देशवासी, आज बुद्ध पौर्णिमा आहे. त्यांनी आपल्याला शांततेचा मार्ग दाखवला आहे. पण तो मार्गही शक्तीच्या माध्यमातून जातो. मानवता शांती आणि समृद्धीच्या दिशेनं जावी, प्रत्येक भारतीय शांतीने जगू शकेल, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करू शकेल यासाठी भारताचं शक्तिशाली असणं फार गरजेचं आहे. गरज पडल्यास या शक्तीचा वापर करणंही गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांत भारतानं हेच केलं आहे”, असं म्हणत त्यांनी जगालाही इशारा दिला आहे.
भारताने फक्त कारवाई स्थगित केली
“मी पुन्हा सांगतो, आपण पाकिस्तानच्या दहशतवादी व लष्करी तळांवरील आपली कारवाई फक्त स्थगित केली आहे. येत्या काही दिवसांत आपण पाकिस्तानच्या हालचाली या निकषांवर पाहू की ते काय पाऊल उचलतात. भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी, एअर फोर्स, आर्मी आणि नौदलानं, आपली बीएसएफ, निमलष्करी दल सातत्याने सतर्क आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर हेच दहशतवादाविरोधात भारताचं धोरण आहे”, असंही ते म्हणाले.