उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवरुन संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची दखल घेतली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनीच ट्विट करत ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितलं असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यासोबत हाथरस घटनेवरुन संवाद साधवा. आरोपींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे असं यावेळी त्यांनी सांगितलं”. योगी आदित्यनाथ यांनी घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं असल्याची माहिती दिली.

आणखी वाचा- Hathras Gangrape: युपी पोलिसांकडून जबरदस्ती करण्यात आले पीडितेवर अंत्यसंस्कार, कुटुंबीयांचा दावा

योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हाथरस सामूहिक बलात्कारातील आरोपींना सोडलं जाणार नाही. घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. हे पथक सात दिवसांत रिपोर्ट सादर करेल. न्याय मिळावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल”.

आणखी वाचा- Hathras Gangrape: यूपी सरकारकडून तपासासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना

बलात्कार पीडित १९ वर्षीय पीडितेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांना वारंवार मृतदेह घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.

आणखी वाचा- Hathras Gangrape : ‘ओढणी गळ्यात टाकून तिला खेचत नेलं आणि…’; जाणून घ्या १४ सप्टेंबरला नक्की काय घडलं

पीडितेच्या भावाने इंडियन एक्स्प्रेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचा मृतदेह घरी आणला जावा यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.

आणखी वाचा- उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

तरुणीच्या मृत्यूपूर्वी कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं होतं की, १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती.

आणखी वाचा- “मला माझ्या मुलीचा चेहराही पाहू दिला नाही”; हाथरस पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली हतबलता

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामूहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एकजण फरार झाला होता त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi spoke to up cm yogi adityanath over hathras gangrape and murder sgy
First published on: 30-09-2020 at 12:19 IST