पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेचं उद्धाटन होणार आहे. नरेंद्र मोदी भारतीय हवाई दलाच्या C-130J सुपर हर्क्यूलस विमानातून या ३.२ किमी एक्स्प्रेसवेवर लँडिंग करणार आहेत. उद्धाटनानंतर हवाई दलाकडून ४५ मिनिटांचा एअर शो होणार आहे. यानंतर नरेंद्र मोदी तिथे उपस्थित जनतेला संबोधित करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर हवाई दल एक्स्प्रेसवर लढाऊ विमानांचं लँडिंग करणार आहे. ‘Touch and Go’ ऑपरेशननुसार ही विमानं एक्स्प्रेसवेला स्पर्श करुन पुन्हा उड्डाण घेतील. सुखोई, मिराज, राफेल, एन ३२ अशा विमानांचा हवाई प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग असेल.

योगी आदित्यनाथ यांनी हा एक्स्प्रेसवे राज्याच्या पूर्व भागातील आर्थिक विकासाचा कणा ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. “हा एक्स्प्रेसवे पूर्व उत्तर प्रदेशच्या विकासात महत्वाचा वाटा उचलेल. याचा उद्घाटन सोहळा भव्य स्वरुपात होणार आहे. सुलतानपूर येथे उभारण्यात आलेला हा ३.२ किमीचा पट्टा विमानांच्या एमर्जन्सी लँडिंगसाठी धावपट्टी म्हणून विकसित करण्यात आला आहे,” अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.

भाजपाने दर्जाशी तडजोड केल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रकल्पाची किंमत कमी करण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीआधी श्रेय घेण्याच्या हेतूने भाजपाने एक्स्प्रेसवेच्या दर्जासोबत तडजोड केल्याचा आरोप केला आहे.

“कमी पैशात काम करण्यासाठी दर्जासोबत तडजोड करण्यात आली आहे. निवडणुकीआधी श्रेय घेण्याच्या हेतूने अर्धवट काम करण्यात आलं आहे,” असं ते म्हणाले आहेत.