पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा गाजावाजा सुरु असतानाच या दौऱ्यावरुन काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे. मोदींच्या अमेरिका दौऱ्यातून फक्त अपेक्षाभंगच झाला. एच १ बी व्हिसा आणि पाकपुरस्कृत दहशतवाद या प्रमुख विषयांवर ट्रम्प यांनी ठोस आश्वासन दिले नाही असे सांगत काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी मोदींवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांचा अमेरिका दौरा केला. या दौऱ्यात मोदींनी २० कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेटही घेतली. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत डिनर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले. मोदींच्या या दौऱ्याची सर्वत्र चर्चा असली तरी काँग्रेसने या दौऱ्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. मोदी आणि ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचा दाखला देत मनीष तिवारी म्हणाले, भारत-अमेरिका एकमेकांपासून दूर जात असल्याचे संयुक्त निवेदनावरुन दिसून येते. एच १ बी व्हिसा नियमांविषयी अमेरिकेने ठोस आश्वासन दिले नाही. दहशतवादाच्या मुद्द्यावरही ट्रम्प यांनी थेट पाकिस्तानचे नाव घेणे टाळले. जगातून इस्लामिक दहशतवाद संपवणार असे त्यांनी सांगितले. पण भारताला पाकपुरस्कृत दहशतवादासंदर्भात अमेरिकेकडून पाठिंबा मिळाला नसल्याचे दिसते. ट्रम्प यांनी निवेदनात उत्तर कोरियाचे नाव घेतले, पण त्यांनी पाकचे नाव घेणे टाळल्याचे तिवारींनी निदर्शनास आणून दिले.

अमेरिकेकडून ड्रोन खरेदीच्या मुद्दयावरही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. भारतातील खासगी एअरलाईन्सने अमेरिकेकडून १०० विमान खरेदी केल्याने अमेरिकेत रोजगार निर्मिती होईल हाच मुद्दा ट्रम्प यांनी सांगितल्याचे तिवारींनी स्पष्ट केले.  मोदी अमेरिकेत पोहोचल्यानंतर ट्रम्प यांनी सहा ट्विट केले. हे सर्व ट्विट अमेरिकेतील अंतर्गत राजकारणाविषयीचे होते. यातून ट्रम्प यांनी कशाला प्राधान्य दिले हे दिसते. भारत- अमेरिकेचे संबंध सुधारण्याकडे ट्रम्प यांनी दुर्लक्ष केले असा दावाही तिवारींनी केला.