देशभरातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ७ तारखेला दिल्लीत आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोदी देशाच्या विविध भागातील दुष्काळी परिस्थितीचा माहिती घेतील. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे निदान आतातरी मराठवाडा आणि विदर्भातील जनतेला दिलासा मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा तीन टक्क्यांवर आला असताना आणि २९ हजार गावांना टँकर आणि रेल्वेने पाणीपुरवठा सुरू असतानाही या असाधारण परिस्थितीत अद्याप दुष्काळ का जाहीर केला नाही, असा खडा सवाल मंगळवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला होता.