पाकिस्तानातील कोटय़वधी जनता दारिद्रय़रेषेखाली असताना पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मालमत्ता दोन अब्ज रुपयांहून अधिक झाल्याने ते सर्वाधिक श्रीमंत राजकीय नेते ठरले आहेत.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे शरीफ यांनी २०१४-१५ या वर्षांचा तपशील सादर केला त्यामध्ये शरीफ आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर २.३६ अब्ज रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी ही मालमत्ता १.७१ अब्ज इतकी होती.
हुदाईबिया इंजिनीअिरग कंपनी आणि हुदाईबिया पेपर मिल्स, मोहम्मद बक्ष टेक्स्टाइल मिल्स आणि रमझान स्पिनिंग मिल्स यामधील मालमत्तेत वाढ झालेली नाही. मात्र चौधरी शुगर मिल्समधील गुंतवणुकीत ६०० टक्केइतकी लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ही गुंतवणूक २० दशलक्ष रुपये इतकी होती ती आता १२० दशलक्ष रुपये झाली आहे.
शरीफ यांच्याकडे परदेशातूनही २३८.९ दशलक्ष रुपयांची मालमत्ता आली असून १० दशलक्ष रुपये किमतीच्या लॅण्ड क्रुझर गाडीसह चार गाडय़ाही आहेत.
पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांची मालमत्ता ३३.३ दशलक्ष रुपये इतकी असून त्यांच्या नावावर पाकिस्तानमध्ये १४ अन्य मालमत्ता आहेत. त्यामध्ये बनी गाला येथील निवासस्थानाचाही समावेश आहे.