Israel Pm Benjamin Netanyahu On PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आज वयाची ७५ वर्षे पूर्ण केले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील राजकीय नेते मंडळी आणि जगातील अनेक दिग्गज नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत आहेत. जगातील अनेक नेत्यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट शेअर करत आणि व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यासह आदी नेत्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, बिन्यामिन नेतान्याहू यांनी एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र असल्याचं म्हटलं आहे.
बिन्यामिन नेतान्याहू यांनी काय म्हटलं?
“माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात भारतासाठी खूप काही साध्य केलं. आपण एकत्रितपणे भारत-इस्रायलच्या मैत्रीला खूप पुढं नेलं आहे. दोन्ही देशांची भागीदारी आणि मैत्री आणखी उंचावर घेऊन जात असताना लवकरच तुम्हाला भेटण्याची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असं बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे.
#WATCH | On PM Modi's 75th birthday, Israel's Prime Minister Benjamin Netanyahu says, "Prime Minister Modi, my good friend Narendra, I want to wish you a happy birthday. You've accomplished so much for India in your life, and we have together accomplished a great deal in the… pic.twitter.com/QOyLoBfY3U
— ANI (@ANI) September 17, 2025
जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींना दिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सतत प्रेरणा मिळत राहो”, अशी आशा मेलोनी व्यक्त केली. मेलोनी यांनी नरेंद्र मोदी हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याची टिप्पणी करत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफार्मवर पोस्ट करून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटलं की “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांची ताकद, निर्धार आणि कोट्यवधी लोकांचं नेतृत्व करण्याची क्षमता आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांना चांगलं आरोग्य आणि ऊर्जा मिळो. ते भारताला उज्ज्वल भविष्याकडे नेत राहतील असा मला विश्वास आहे. तसेच त्यांच्यामुळे भारत व इटली या दोन्ही देशांमधील संबंध खूप दृढ होतील अशी आशा देखील आहे.”
डोनाल्ड ट्रम्प यांच्याही मोदींना शुभेच्छा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त फोन करून शुभेच्छा दिल्या. स्वतः मोदी यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. या पोस्टमधून मोदी यांनी ट्रम्प यांचे शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याबद्दल आभार मानले आहेत. दोन्ही देशांच्या प्रमुखांमधील फोनवरील संभाषणात युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी अमेरिकेने घेतलेल्या पुढाकारांना पंतप्रधान मोदींनी पाठिंबा दिल्याची माहिती आहे. तर तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत व अमेरिकेतील व्यापक व जागतिक भागिदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदींनी एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की , “माझे मित्र, राष्ट्रपती ट्रम्प, माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही फोन केल्याबद्दल आणि मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल मी आभारी आहे.”