पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत दाखल झालेल्या शेतकरी मोर्चाची दखल घेतली पाहिजे असे मत भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी व्यक्त केले आहे. आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. शेतकऱ्यांचा रोष ओढवून एकाही सरकारचे भले झालेले नाही असेही देवेगौडा यांनी म्हटले आहे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्यासाठी निश्चितच योग्य ती पावले उचलली पाहिजेत. रामलीला मैदानावर जाऊन त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली ज्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

देशातला शेतकरी आता जागा होऊ लागला आहे. त्यांना सरकारला कसे वठणीवर आणायचे हे चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आंदोलनाची दखल घेऊन या शेतकऱ्यांना भेटले पाहिजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत असेही देवेगौडा यांनी म्हटले आहे.

कर्जमाफीची मुख्य मागणी इतर मागण्यांसाठी देशभरातले शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत. तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी तर कवटी आंदोलन पुकारले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कवट्या हाती घेऊन ते दिल्लीत दाखल झाले आहेत. जोपर्यंत आमची कर्जमाफीची मुख्य मागणी मान्य होत नाही आणि इतर मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. इतकेच नाही तर संसदेवर मोर्चा काढू दिला नाही तर निर्वस्त्र होऊन मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे.