सायनाईड विषामुळे झिम्बाब्वेतील हाँग नॅशनल पार्क येथे २२ हत्ती मरण पावले आहेत, असे वन्यजीव व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले.
ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतील शिकाऱ्यांनी या हत्तींना विष घातल्याने आतापर्यंत ६२ हत्ती मरण पावले आहेत. वन्य खात्यातील रेंजर्सना हाँग पार्कच्या सिनामाटेला भागात हत्तींचे सांगाडे सापडले असल्याची माहिती कॅरोलिन वाशया वाशाया मोयो यांनी सांगितले.
सायनाइडमुळे या २२ हत्तींचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले असून शिकाऱ्यांनी तीन हस्तिदंत चोरून नेले आहेत. लहान हत्तींनाही यात मारण्यात आल्याचे दिसून आले आहे. सायनाइडच्या विषामुळे हत्तींची संख्या कमी होत असून सायनाईडमुळे इतर प्राणीही मरत आहेत. राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी शिकाऱ्यांच्या विरोधात आम्हाला मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. ऑक्टोबरपासून झिम्बाब्वेमधील उद्यानांमध्ये असे किमान तीन प्रसंग घडले असून त्यात चाळीस हत्ती सायनाईडने मरण पावले होते. तीन हत्ती कैरीबा भागात मारले गेले. २०१३ मध्ये हाँग येथे २०० हत्ती सायनाईडने मारण्यात आले होते. वाशाया मोयो यांनी सांगितले की, पार्कच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी संस्थेने दक्षिण आफ्रिकेतून काही कुत्रे आणले असून शिकार रोखण्यासाठी ड्रोन विमानांचाही वापर केला आहे. राष्ट्रीय उद्यानांनी हरारे विमानतळावरून १७३ किलो म्हणजे ३८० पौंड हस्तिदंत जप्त केले असून त्याची किंमत ४३२५० अमेरिकी डॉलर्स आहे. तस्करीप्रकरणी आतापर्यंत झिम्बाब्वेच्या तीन व मालीच्या एका नागरिकाला अटक केली आहे, असे उद्यानाची देखभाल करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे.