ग्रीसमधील लेसबॉस या बेटावरून रात्रीचे आकाश न्याहाळत असताना कवयित्री सॅफॉ हिने मिडनाइट पोएम नावाची एक कविता २५०० वर्षांपूर्वी केली होती, ज्या दिवसाचे वर्णन तिने केले आहे तेव्हाचे आकाश नेमके कसे होते याचा शोध वैज्ञानिकांनी एका खगोलीय सॉफ्टवेअरच्या मदतीने घेतला आहे.
सॅफॉ हिने मिडनाइट पोएम या कवितेत जे आकाश वर्णन केले आहे त्यात कृतिका नक्षत्र दिसत होते व त्याभोवती ही कविता गुंफलेली आहे. त्यावेळी सॅफॉ हिने लेसबॉस बेटांवरून जे मध्यरात्रीचे आकाश बघितले होते त्यात कृतिका तारकासमूह होता. त्यावेळचे आकाश नेमके कसे होते त्यात काय दिसत होते यावरून ती कविता नेमकी कधी लिहिली याचाही शोध घेण्यात आला आहे. त्यानुसार ते वर्णन ख्रि.पू. ५७० या वर्षांतील एका रात्रीचे आहे, असे अर्लिगटन येथील टेक्सास विद्यापीठाचे प्राध्यापक मॅनफ्रेड कुंटझ यांनी सांगितले. संशोधकांनी स्टारी नाईट या आज्ञावलीचा वापर करून तेव्हाचे आकाश कसे होते व स्थानिक प्रमाणवेळेनुसार ख्रि.पू. ५७० मध्ये त्या रात्री कृतिका नक्षत्र नेमके केव्हा आकाशात दिसत होते याचा शोध घेतला आहे.
डिगीस्टार ५ या ग्रहीय आज्ञावलीचा वापर करून सॅफॉ जिथे होती ते ठिकाण व वेळ लक्षात घेऊन त्यावेळी ग्रीसमधील लेसबॉस बेटांवरचे आकाश कसे होते हे आणखी अचूकतेने शोधण्यात आले आहे. डिगीस्टार सॉफ्टवेअर हे कुठल्याही तारखेला व कुठल्याही ठिकाणी रात्रीचे आकाश भूतकाळात, भविष्यकाळात कसे होते व कसे राहील हे सांगू शकते, असे प्लॅनेटरियमचे संचालक लेव्हेंट गुरडेमीर यांनी सांगितले.
तारांगणाचा वापर अशाप्रकारे संशोधनासाठीही करता येतो. त्यातून खगोलशास्त्राच्या पलीकडे जाऊन, भूगर्भशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, कला, साहित्य, स्थापत्य, इतिहास व वैद्यकातही डोकावता येते असे ते म्हणाले. स्टारी नाईट या आज्ञावलीनुसार ख्रि.पू. ५७० मध्ये कृतिका नक्षत्र २५ जानेवारीला आकाशात मध्यरात्री दिसत होते त्यामुळे ती कविता त्या काळातली आहे. त्याच वर्षांत कृतिका नक्षत्र मग वेगळ्या वेळांना आकाशात दिसत होते. अगदी अचूक काळ सांगणे अवघड आहे कारण त्यावेळी यांत्रिक घडय़ाळे उपलब्ध नव्हती, असे कुंटझ यांनी सांगितले. असे असले तरी कृतिका नक्षत्र त्या वर्षी मध्यरात्री सर्वात लवकरच्या तारखेला केव्हा दिसले असेल याचा विचार केला आहे. आकाश काळेभोर असताना सूर्य उणे १८ अंशावर होता तो दिवस ३१ मार्च होता. त्यामुळे कवितेचा काळ हा थंडीचा मध्यावधी व उन्हाळ्याची सुरुवात या दरम्यान होता असा नवीन अंदाज आहे. सॅफॉ ही त्या काळातील प्रख्यात कवयित्री होती. तिचा खगोलशास्त्रातील रस हा केवळ कवितेपुरता मर्यादित नव्हता, तर ती तिच्या नोंदीत सूर्य, चंद्र व शुक्र तसेच इतरही ग्रह ताऱ्यांचे संदर्भ लिहित असे. सॅफॉ ही ग्रीक खगोलशास्त्रात अनौपचारिक काम करणारी कवयित्री होती असे कुंटझ यांनी म्हटले आहे. जर्नल ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल हिस्टरी अँड हेरिटेज या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poetess sappho midnight poem
First published on: 20-05-2016 at 01:43 IST