सोशल मीडिया स्टार बॉबी कटारियावर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. ‘स्पाईस जेट’च्या विमानात धुम्रपान करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉबी वादात सापडला होता. घटनेच्या सात महिन्यांनंतर बॉडी बिल्डर बॉबी कटारिया ऊर्फ बलवंत कटारियावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

जानेवारीमध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून टीका करण्यात आली होती. काही नागरिकांनी याबाबत बॉबीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली होती. याप्रकरणाची दखल घेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

“मेरा पिछा छोडो बहन”; सोशल मीडियावर रंगला ऋषभ पंत अन् उर्वशी रौतेलाचा वाद

२४ जानेवारीला ही घटना निदर्शनास आल्यानंतर २ फेब्रुवारीला ‘स्पाईस जेट’ कंपनीने गुडगाव पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरील हा प्रकार असल्याचे या एअरलाईन कंपनीने तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर ‘स्पाईस जेट’चे कायदेशीर व्यवहारांचे व्यवस्थापक जसबीर चौधरी यांनी दिल्ली पोलिसांकडे १३ ऑगस्टला याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आपल्या कृतीतून चाहत्यांना बेकायदेशीर वर्तन करण्यास बॉबी प्रोत्साहित करत असल्याचं चौधरी यांनी तक्रारीत म्हटलं होतं. कायदेशीर मार्गदर्शन घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी नागरी विमान सुरक्षा कायदा १९८२ अंतर्गत कलम ३ नुसार बॉबीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

“बॉबीच्या व्हिडीओसंदर्भातील संपूर्ण चौकशी जानेवारीमध्ये करण्यात आली होती. यासंदर्भात गुडगावमधील उद्योग विहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण या पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे पोलिसांनी सूचित केल्यानंतर दिल्ली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. हे प्रकरण सिव्हिल एव्हिएशनकडे देखील पाठवण्यात आले असून याबाबतचा निकाल प्रलंबित आहे”, अशी माहिती ‘स्पाईस जेट’ कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे.

ओळखलंत का? दुबईच्या राजपुत्राचा मेट्रो प्रवास; प्रवाशांनी पाहूनही असं काही केलं की..

दरम्यान, शूटिंगसाठी वापरण्यात आलेल्या एका डमी विमानातील हा व्हायरल व्हिडीओ असल्याचे स्पष्टीकरण बॉबी कटारियाकडून देण्यात आलं आहे. “माझ्या बायोपिकसाठी २०१९ किंवा २०२० मध्ये हा व्हीडिओ शूट करण्यात आला होता. दुबईतील हा व्हिडीओ असून यात दिसत असलेले लोकही चित्रिकरणाचा भाग आहे”, असे बॉबीने म्हटले आहे.