मध्य प्रदेशातील उज्जैन येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर सापडली. तिच्यावर बलात्कार करून तिला शहरातील दांडी आश्रमाजवळ फेकून देण्यात आलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला गेला. याप्रकरणी पोलिसांनी आता कारवाई केली असून संबंधित आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. तर, तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एवढंच नव्हे तर संबंधित पीडिता मानसिक रुग्ण असल्याचंही समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात

अटक केलेल्या रिक्षाचालकाचं नाव भारत सोनी आहे. आज घटनास्थळी आरोपीला नेण्यात आलं होतं. यावेळी तो पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, पोलिसांनी त्याला तत्काळ पकडलं. या धडपडीत भारत सोनीला दुखापत झाली. त्यामुळे त्याला रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. तो सध्या बरा आहे. तर पीडिता मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील असून पोलिसांनी कुटुंबियांशी संपर्क साधला आहे.

सर्व रिक्षाचालकांची होणार चारित्र्य पडताळणी

पोलीस अधीक्षक सचिन शर्मा म्हणाले, “आम्ही आरोपींना गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी घेऊन जात होतो. त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असून तो जखमी झाला आहे. आमचे पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. आम्ही उज्जैनमधील सर्व ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा चालकांचे चारित्र्य पडताळणी करणार आहोत.”

ही घटना समोर आल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्याकरता पोलिसांनी २८ सदस्यांची टीम तयार केली आहे. तसंच, तांत्रिक पद्धतीनेही तपास करण्यात आला. त्यामुळे आरोपीला पकडण्यात यश आले.

नेमकं प्रकरण काय?

२५ सप्टेंबर रोजी एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पीडितेच्या आजोबांनी पोलिसांत केली होती. बेपत्ता मुलीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, ती कुठेही सापडली नाही. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास परिसरातील मेंढ्या चारून घरी परतल्यानंतर मुलगी बेपत्ता झाली. संबंधित मुलगी मानसिक रुग्ण असून तिला तिच्या गावाचे नावदेखील घेता येत नाही, अशी माहिती पीडितेच्या आजोबांनी तक्रारीत दिली होती.

दरम्यान, संबंधित पीडित मुलगीउज्जैनमधील मंदिरांभोवती फिरते आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या जेवणावर स्वतःचा उदरनिर्वाह करते. ती आजूबाजूच्या परिसरात फिरत असताना एक माणूस तिच्याजवळ आला. त्याने तिचं तोंड दाबलं. तिचा गळा दाबला. तिचे कपडे फाडले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीवर अत्याचार झाल्यानंतर ती मदतीसाठी इतरस्त्र फिरत होती. परंतु, तिच्या मदतीला कोणीही आले नाही. अर्धनग्न अवस्थेत ती रात्रभर रस्त्यावर फिरत राहिली. अखेर, सकाळी ९.२५ वाजता राहुल शर्मा (२१) या आश्रमसेवकाने पीडितेला पाहिले. या मुलाने तिच्यावर अंगावर वस्त्र टाकले. तिचा जेवण आणि पाणी दिल्यानंतर यासंबंधीत तक्रार त्याने पोलिसांत केली.