१६ वर्षांच्या तरुणीशी गैरवर्तन आणि तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी तथाकथित स्वयंघोषित गुरू आसारामबापू याच्याविरोधातच जोधपूरच्या पोलिसांनी बुधवारी आरोपपत्र दाखल केले. आसारामला अटक करण्यात आल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सुमारे हजारभर पानी आरोपपत्रात पोलिसांनी आसारामविरोधात अत्यंत गंभीर अशी कलमे लावली असून त्यामुळे आसारामला प्रसंगी जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते. अशा शिक्षेचा पोलीसही आग्रह धरण्याची दाट शक्यता आहे.
आसारामविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात १२१ दस्तावेज तसेच ५८ जणांच्या जबानीचा समावेश आहे. या प्रकरणातील सहआरोपी शिल्पी, शिवा, प्रकाश आणि शरदचंद्र यांच्यासह आसाराम यांच्या उपस्थितीत जिल्हा आणि सत्र न्यायालयात पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मनोजकुमार व्यास यांनी या सर्वाच्या न्यायालयीन कोठडीत १६ नोव्हेंबपर्यंत वाढ केली असून त्यानंतर आरोपपत्रामधील आरोपांवरील सुनावणीस प्रारंभ होईल.
सदर मुलीच्या आईवडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आसारामला इंदूर येथील आश्रमातून ३१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या चौघा साथीदारांनाही त्यानंतर काही आठवडय़ांतच पोलिसांनी जेरबंद केले. अल्पवयीन मुलीवर बलात्कार, महिलांचा विनयभंग, गुन्हेगारी वर्तन आदी आरोप आसारामवर ठेवण्यात आल्याचे फिर्यादी पक्षाचे वकील प्रद्युम्नसिंग यांनी सांगितले.
हे आणि अन्य आरोप सिद्ध झाल्यास १० वर्षे तुरुंगवास आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे सदर मुलीचे वकील मनीश व्यास यांनी सांगितले, तर या प्रकरणी आपल्याला अडकविण्यात आले असून आपल्याविरोधात खोटे आरोप ठेवण्यात आल्याचा कांगावा आसारामने केला.