‘दंगली हाताळताना पोलिसांनी संयम दाखवावा’

एकविसाव्या शतकातील पोलिस दले क्रूर असून चालणार नाही.

Home Minister Rajnath Singh,
गृहमंत्री राजनाथ सिंह

आधुनिक काळात पोलिसांनी क्रूरपणे काम करणे अपेक्षित नाही तर त्यांनी सुसंस्कृतपणा दाखवून संयमाने संवेदनशील परिस्थिती हाताळली पाहिजे, दंगली व निदर्शनांसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी संयमानेच वर्तन केले पाहिजे, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीतील पोलिस दलांनी नवीन तंत्रज्ञान अंगीकारतानाच निदर्शने व दंगलीच्या वेळी जमावाला नियंत्रित करून त्यांची मने वळवण्यासाठी मानसशास्त्रीय उत्तरेही शोधली पाहिजेत. जलद कृती दलाच्या रजत जयंती समारंभा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जातीयवाद, धार्मिकतावादाच्या आधारे देशाचे विभाजन करण्याचे जे प्रयत्न होतात, त्यावर वेळीच मात करण्याची कौशल्ये पोलिसांमध्ये असली पाहिजेत. एकविसाव्या शतकातील पोलिस दले क्रूर असून चालणार नाही. त्यांनी सुसंस्कृत सुरक्षा दलासारखे काम केले पाहिजे. काही वेळा हलक्या बळाचा वापर करावा लागतो पण अशा परिस्थितीतही शहाणपणाने निर्णय घेतले पाहिजेत. गर्दीच्या नियंत्रणासाठी कमी घातक नसलेले मार्ग शोधून काढण्यास ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेला सांगितले आहे, कमीत कमी बळात जास्तीत जास्त परिणाम साधण्याची कला पोलिसांनी साध्य केली पाहिजे. जलद कृती दलाने आतापर्यंत जे काम केले आहे, ते प्रशंसनीय आहे. त्यातील पाच नवीन बटालियन पुढील वर्षी कार्यरत होतील. सध्या त्यांच्या दहा बटालियन (१० हजार जवान) कार्यरत आहेत. त्या दहा शहरांत काम करतात.

१० हजार रुपये गणवेश भत्ता

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या जवानांना यापुढे गणवेश शिवून घेण्यासाठी दहा हजार रुपये भत्ता दिला जाईल व तयार गणवेश देण्याची प्रथा बंद करण्यात येत आहे, अशी घोषणा राजनाथ सिंह यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Police should show patience in tackling riots says rajnath singh