पीटीआय, बंगळूरु
कर्नाटकातील हासनचा जेडीएसचा खासदार प्रज्वल रेवण्णाच्या विरोधात करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारांच्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करावी ही मागणी राज्यातील भाजप नेत्यांनी रविवारीही कायम ठेवली. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेले विशेष तपास पथक (एसआयटी) जाणीवपूर्वक निर्दोष लोकांना अडकवत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. तर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सीबीआय चौकशीची मागणी फेटाळत ‘एसआयटी’वर आपला विश्वास असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>‘मॅगी’सह भात खाल्ल्यानंतर १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कुटुंबातील इतरांनाही विषबाधा
माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू असलेल्या प्रज्वलविरोधातील लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमुळे राज्यात काँग्रेस आणि भाजपदरम्यान वाद सुरू आहे. आरोपांचा निष्पक्ष तपास करण्यासाठी सीबीआय चौकशी केली जावी आणि चित्रफिती प्रसिद्ध करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी भाजप आणि जेडीएसने केली आहे.
बंगळूरुमध्ये पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, ‘‘ज्या प्रकारे चौकशी प्रक्रिया सुरू आहे त्यावर लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. (या प्रकरणाच्या संबंधाने) खोटी तक्रार दाखल करण्यासाठी एका महिलेवर दबाव टाकण्यात आल्याची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे, तसेच लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची माहिती देणाऱ्यांविरोधातदेखील तक्रारी दाखल केल्या जात आहेत.’’ दोषींना शिक्षा होईल याची खबरदारी घेणे ही ‘एसआयटी’चे प्राथमिक जबाबदारी असताना ते सूडबुद्धीने वागत आहेत, असा आरोपही बोम्मईंनी केला.
मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली आहे. राज्य पोलिसांच्या ‘एसआयटी’वर आपल्याला पूर्ण विश्वास आहे असे ते म्हणाले. ‘एसआयटी’ निष्पक्षपणे चौकशी करत असताना भाजप जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहे अशी टीका त्यांनी केली.