रक्तद्रवाचा वापर होत नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या निर्मिती प्रक्रियेभोवती काँग्रेसने निर्माण केलेल्या वादाविरोधात बुधवारी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. देशी बनावटीच्या या लशीमध्ये नवजात वासराचा रक्तद्रव (सीरम) वापरल्याचा दावा काँग्रेसचे नेते गौरव पांधी यांनी केला. त्यावर, काँग्रेसने कोव्हॅक्सिनबद्दल लोकांची पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याची संतप्त टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. हा दावा पूर्णत: चुकीचा असून लशीमध्ये रक्तद्रव नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक गौरव पांधी यांनी माहितीच्या अधिकारात ‘कोव्हॅक्सिन’च्या निर्मितीच्या प्रक्रियेची माहिती मागितली होती. त्यांनी विचारलेल्या १२ प्रश्नांपैकी ८ व्या प्रश्नाच्या उत्तरात वासराच्या रक्तद्रवाचा (सीरम) उल्लेख केला आहे. हा आधार घेत पांधी यांनी कोव्हॅक्सिन लशीत वासराच्या रक्तद्रवाचा वापर केला जातो व त्यासाठी वीस दिवसांच्या वासराची हत्या केली जात असल्याचा आरोप केला. या आरोपामुळे बुधवारी ‘कोव्हॅक्सिन’च्या निर्मितीवरून राजकीय वाद झाला.

गांधी कुटुंबाचे लसीकरण झाले का? – भाजप

काँग्रेस नेत्याच्या दाव्यावर भाजपने शाब्दिक हल्लाबोल केला असून काँग्रेस करोना लशीबद्दल सातत्याने लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप पक्ष प्रवक्ता संबित पात्रा यांनी केला. लसमात्रा वाया घालवण्यासाठी आणि लस घेण्यात संकोच करण्यासाठी अशा दोन नको त्या कारणांसाठी काँग्रेस लोकांच्या लक्षात राहील. गांधी कुटुंबाने कोव्हॅक्सिन लशीवर सातत्याने शंका घेतली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वढेरा यांचे लसीकरण झाले का व कधी? कोव्हॅक्सिनवर गांधी कुटुंबाचा विश्वास आहे का? केंद्रात काँग्रेसचे सरकार आले की लस घेऊ असे ते सांगतात. करोनासारख्या जागतिक साथरोगाच्या काळात वैज्ञानिक विचार लोकांसमोर ठेवले पाहिजेत, भ्रम नव्हे, अशी टीका पात्रा यांनी केली.

लशीमध्ये नव्हे, पेशींच्या वाढीसाठी वापर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तातडीने दखल घेत हा कथित दाव्यातील फोलपणा उघड केला. लशीच्या निर्मितीसंदर्भात दिलेल्या माहितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. नवजात वासराचा रक्तद्रव वापरला जात असला तरी, त्याचा उपयोग फक्त पेशींची (व्हेरो सेल) वाढ करण्यासाठी असतो. पोलिओ, रेबिज, इन्फ्लुएन्झा लस तयार करण्यासाठीही वासराच्या रक्तद्रवाचा वापर केला जातो. करोना लस निर्माण करण्यासाठी ‘व्हेरो सेल’चा आधार घेतला जातो. या पेशींची वाढ झाल्यानंतर त्या पाणी आणि रसायने वापरून धुतल्या जातात. पेशींच्या मदतीने विषाणूंची वाढ केली जाते. या प्रक्रियेत या पेशी नष्ट होतात. त्यानंतर विषाणूही नष्ट होतात व त्यापासून अंतिम लशीची निर्मिती केली जाते. त्यामुळे वासराचा रक्तद्रव हा लशीतील घटक नाही, असे सविस्तर स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिले. हेच स्पष्टीकरण कोव्हॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीनेही दिले.