केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका
ग्रामीण भागांतील समस्यांपासून राजकीय नेते आणि नोकरशहा फार दूर असल्याची टीका केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे केली. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निधीची तरतूद केलेली असतानाही त्याचे इच्छित परिणाम दिसलेले नाहीत, असेही ते म्हणाले.
आणंद ग्रामीण व्यवस्थापन संस्थेच्या (आयआरएमए) ३५ व्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते.
गेल्या अनेक वर्षांपासून आपण दिल्लीत वास्तव्य करीत आहोत, मात्र गावांची कैफियत दिल्लीपर्यंत पोहोचतच नाही. ग्रामीण भारताला भेडसावणाऱ्या समस्यांपासून राजकीय नेते आणि नोकरशहा फार दूर आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न केले जात नाहीत, असेही गडकरी म्हणाले.
ग्रामीण भाग रस्त्यांनी जोडण्यास प्राधान्य दिले जात नाही, आपण ७० हजार कोटी रुपये खर्चून हेलिकॉप्टर खरेदी केली, मात्र आमच्या गावांकडे पिण्यासाठी अथवा सिंचनासाठी पाणी नाही. जवळपास २५ ते ३० टक्के ग्रामीण लोकसंख्या शहरांकडे नाईलाजाने जात आहे कारण गावांमध्ये शाळा, महाविद्यालय आणि चांगले रस्ते नाहीत, असेही ते म्हणाले.