चेन्नई : सुप्रसिद्ध संगीतकार इलाय राजा यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्याने वाद निर्माण झाला आहे. इलाय राजा यांना भाजपतर्फे राज्यसभेवर नियुक्त केले जाण्याची शक्यता असून त्यांच्या वक्तव्याकडे या दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. 

 दिल्लीस्थित ब्लूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशनने ‘आंबेडकर अ‍ॅन्ड मोदी- रिफॉर्मर्स आयडियाज, परफॉर्मर्स इम्लिमेनटेशन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध केले असून त्याच्या प्रस्तावनेत इलाय राजा यांनी ही तुलना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सामाजिकदृष्टय़ा मागास वर्गातील लोक ज्या आव्हानांचा सामना करतात, त्यांच्यावर या दोनही तेजस्वी व्यक्तिमत्वांनी यशस्वीरीत्या मात केली. या दोघांनीही गरिबी आणि विषम सामाजिक स्थिती जवळून पाहिली आणि ती नष्ट करण्यासाठी कार्य केले. हे दोघेही व्यवहार्य दृष्टीचे असून त्यांनी केवळ सैद्धांतिक मांडणी करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्व दिले, असे इलाय राजा यांनी म्हटले आहे. 

डाव्या विचारसणीच्या कार्यकर्त्यांनी इलाय राजा हे ‘संघी’ असल्याची टीका केली आहे. पण राजा यांना कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नसून त्यांच्यावर होणारी ही टीका अन्यायकारक आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई म्हणाले की, इलाय राजा यांच्यावर टीका करणारे हे सत्तेचे दलाल आहेत. द्रमुकने तयार केलेले हे वातावरण इलाय राजा यांचा आवाज दडपून टाकू शकत नाही. 

मोदी यांचे कौतूक

मोदी यांच्या कार्यकाळातील तिहेरी तलाकविरोधी कायद्याचा संदर्भ देत इलाय राजा यांनी म्हटले आहे की, तिहेरी तलाकविरोधी कायद्यासारखे सामाजिक कायदे आणि बेटी बचाओ- बेटी पढाओ मोहिमेतून मुलींच्य जन्मदरात झालेली सुधारणा, या अशा काही बाबी आहेत, ज्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिमानच वाटला असता.