दिल्लीत एकीकडे शरद पवारांनी यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असतानाच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा भेटीला पोहोचले आहेत. शरद पवार सध्या दिल्लीत असून प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील गेल्या ४८ तासांतील ही दुसरी भेट असून १५ दिवसांतील तिसरी भेट आहे. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाआघाडीची चाचपणी

प्रशांत किशोर यांनी सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. याआधी ११ जून रोजी मुंबईतही प्रशांत किशोर यांनी पवारांशी तीन तास चर्चा केली होती. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेससाठी किशोर यांच्या ‘आय-पॅक’ कंपनीने यशस्वी निवडणूक रणनीती आखली होती. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर, केंद्रातील मोदी सरकारविरोधात बिगरभाजप-बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी स्थापन करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली असून, दिल्लीतील पवार-किशोर यांच्या भेटीने या चर्चेला उधाण आलं होतं.

भाजपविरोधात महाआघाडी तूर्त नाहीच!

काँग्रेसला डावलून भाजपविरोधात महाआघाडी तयार करण्याचा कोणताही प्रयत्न सुरू नाही, असे स्पष्टीकरण ‘राष्ट्र मंच’ने मंगळवारी दिलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अडीच तास झालेल्या बहुचर्चित बैठकीनंतर महाआघाडीची शक्यता तूर्तास तरी संपुष्टात आली. या बैठकीत ८ राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

पवारांसोबतच्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली?; प्रशांत किशोर यांनी केला मोठा खुलासा

बिगरभाजप-बिगरकाँग्रेस तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत प्रसारमाध्यमांतून चर्चा झाली असली तरी, ही बैठक राजकीय नव्हती. काँग्रेसला बाजूला सारून पवारांनी राजकीय पाऊल उचललेलं नाही. पवारांच्या घरी ही बैठक झाली असली तरी तिचे आयोजन यशवंत सिन्हा यांनी केलं होतं, पवारांनी नव्हे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी स्पष्ट केलं.

या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या वतीने यशवंत सिन्हा, सपचे घनश्याम तिवारी, राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, आपचे सुशील गुप्ता, भाकपचे विनय विश्वम, माकपचे निलोत्पाल बसू, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीद मेमन, वंदना चव्हाण आदी नेते उपस्थित होते. शिवाय, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, जावेद अख्तर, काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा, जनता दल (संयुक्त)चे माजी सदस्य पवन वर्मा, निवृत्त न्या. ए. पी. शहा, के. सी. सिंग आदी मान्यवरही होते. मात्र, द्रमुक, बसप, तेलुगु देसम, तेलंगण राष्ट्र समिती तसेच अन्य भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांविना ही बैठक घेण्यात आली.

भाजपाची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील संभाव्य आघाडी हा जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून अशी कितीही शून्ये एकत्र केली तरी त्यातून एक पूर्णांक तयार होत नाही. नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poll strategist prashant kishor reaches to meet ncp sharad pawar sgy
First published on: 23-06-2021 at 11:19 IST