पुंछमधील दहशतवादी हल्ला हा पुलवामा हल्ल्यासारखाच असून हे केंद्र सरकारनेच रचलेलं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते भाई विरेंद्र यांनी केला आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने रचलेला हा कट असू शकतो, असंही ते म्हणाले. दरम्यान, भाई विरेंद्र यांच्या आरोपांनंतर पुन्हा देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग अखेर पंजाब पोलिसांच्या ताब्यात; मोगा येथे केलं आत्मसमर्पण!
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरजेडी आमदार भाई वीरेंद्र यांनी नुकताच पुंछ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तुलना २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्याशी केली आहे. ते म्हणाले, दोन्ही हल्ल्याचे स्वरुप सारखेच आहे. हे केंद्र सरकारचेच षडयंत्र आहे. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी देशात धार्मिक तेढ निर्माण करून मतं मिळवण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारने हा कट रचला असू शकतो.
पुढे बोलताना त्यांनी या घटनेबाबत दु:खही व्यक्त केले. पुंछमध्ये झालेला दहशतवादी हल्ला दुर्दैवी आहे. या हल्ल्यात आपले पाच जवान शहीद झाले. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
हेही वाचा – मलिक यांना ताब्यात घेतले नाही; दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण
दरम्यान, भाई विरेंद्र यांच्या आरोपांना भाजपानेही प्रत्यु्त्तर दिलं आहे. आम्हाला आरजेडी नेत्यांच्या मानसिकतेची कीव येते. ते सत्तेसाठी काहीही करू शकतात. या हल्ल्यात जे जवान शहीद झाले, त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करायला आरजेडी नेत्यांकडे वेळ नाही. मात्र, असे बिनबुडाचे आरोप करायला त्यांच्याकडे वेळ असतो. अशा लोकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देणंही आमच्यासाठी लज्जास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अरविंद कुमार सिंह यांनी दिली.