उत्तर प्रदेशमधील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. गरीबांना ‘लाच’ देऊन राजकारणी मते मिळवतात, असा आरोप त्यांनी केला आहे. गरीबांची मते मिळवून सत्तेवर आल्यावर ते गरीबांच्या विकासाकडे दुर्लक्ष करतात, असे त्यांनी म्हटले आहे.
बलरामपूर येथे रविवारी एका कार्यक्रमात ओमप्रकाश राजभर यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, सर्व गरीब नेत्यांनी दिलेली दारु पितात, चिकनवर ताव मारतात आणि त्यांनाच मत देतात. चांगले काम करणाऱ्यांना ते मत देत नाही. पण त्यानंतर दिल्ली, लखनौत जाणारे हे नेते पाच वर्ष तुम्हालाच कोंबडा बनवतात. या अवस्थेसाठी तुम्ही स्वत:च जबाबदार आहात, असे त्यांनी म्हटले आहे. मद्यप्राशन केल्यावर गरीब स्वतःला राष्ट्रपतीपेक्षा वरच्या पदावर असल्यासारखा समजू लागतो, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
ओमप्रकाश राजभर हे सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकारसोबत सत्तेत आहे. राजभर यांनी यापूर्वीही बेताल विधान केले होते. मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या आई- वडिलांना पाच दिवस तुरुंगात डांबून ठेवणार, अशी तंबीच देतानाच ज्या गरिबांची मुले शाळेत जाणार नाही त्यांना मी तुरुंगात टाकणार, मग यासाठी मला फाशी झाली तरी चालेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यापूर्वी मे महिन्यातही त्यांनी अजब विधान केले होते. ‘तुमच्याकडे एखादा भाजप कार्यकर्ता चुकीचे काम करवून घेण्यासाठी आला आणि त्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांना काठीने मारुन पळवून लावा’ असा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला होता.