पोर्तुगालमध्ये एका भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर खळबळ माजली आहे. इतकंच नाही, तर महिलेच्या मृत्यूनंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं आहे. त्यांनी राजीनामा दिला असून, पंतप्रधानांनी तो स्वीकारला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लिस्बन येथे हृदयविकाराचा झटका आलेल्या ३४ वर्षीय भारतीय महिलेचा रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यान दुसऱ्या रुग्णालयात नेलं जात असताना मृत्यू झाला.

इमर्जन्सी सेवा बंद केली असल्याने, तसंच रुग्णालयांमधील डॉक्टरांचा तुटवडा आणि गर्भवती महिलांना योग्य सेवा मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून आरोग्यमंत्र्यांवर टीका केली जात होती. पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी ट्विटरवर मार्टा टेमिडो यांनी करोना काळात केलेल्या कामाचं कौतुक केलं असून, देशाची आरोग्यव्यवस्था मजबूत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

भारतीय गर्भवती महिला पोर्तुगालमध्ये फिरण्यासाठी आली होती. महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात आली होती. मात्र देशातील या सर्वात मोठ्या रुग्णालयातील प्रसूती कक्षात तिला जागा मिळाली नाही. यामुळे, तिला दुसऱ्या रुग्णालयात जाण्यात सांगण्यात आलं. महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेलं जात असताना, तिला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर या महिलेचा मृत्यू झाला. महिलेने बाळाला जन्म दिला आहे.

सोशल मीडियावर खळबळ

महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच, सोशल मीडियावर खळबळ माजली. नेटकरी पोर्तुगाल सरकारवर जोरदार टीका करत आहेत. यानंतर आरोग्यमंत्री मार्टा यांनी राजीनामा दिला. मार्टा २०१८ पासून देशाच्या आरोग्यमंत्री होत्या. देशातील करोना स्थिती योग्य रितीने हाताळण्याचं श्रेय त्यांनाच दिलं जातं.