भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने टोकाचे पाऊल उचलत भारतासोबतची टपाल सेवा अचानक बंद केली होती. यावर आंतरराष्ट्रीय निकषांचे उल्लंघन झाल्याचा आरोप भारताने केला होता. भारताच्या दबावानंतर पाकिस्तानकडून पुन्हा ही टपाल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, पार्सल सेवा अद्यापही बंदच आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानकडून भारतासोबतची टपाल सेवा बंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ऑक्टोबर महिन्यांत दिली होती. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ही गोष्ट घडली होती. त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. पाकिस्तानच्या या एकतर्फी कारवाईचा निषेध करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले होते, पाकिस्तानने हे पाऊल उचलत आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले आहे. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय पाकिस्तानने गेल्या दोन महिन्यांपासून भारताची टपाल सेवा बंद केली आहे. ऑगस्ट महिन्यापासूनच भारताकडून आलेल्या टपालांचा स्विकार पाकिस्तानने केलेला नाही.

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपवल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले होते. पाकिस्तानी माध्यमांच्या ताज्या वृत्तानुसार, पाकिस्तानकडून जे टपाल पाठवण्यात आले आहेत त्यांना एअरलाइन्सच्या माध्यमातून उपलब्ध सेवांद्वारे भारतात पोहोचवण्यात येत आहे.

यापूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये तीन वेळेस युद्ध झाले मात्र त्या काळातही पाकिस्तानने कधी भारताची टपाल सेवा खंडीत केली नव्हती. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानने भारतासोबतची टपाल सेवा बंद करण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Postal services with india have resumed parcels are still banned says pakistan media aau
First published on: 19-11-2019 at 13:52 IST