scorecardresearch

Video: “गां** दम असेल तर…”; भाजपावर टीका करताना प्रकाश आंबेडकरांचं आक्षेपार्ह विधान

भाजपाच्या दडपशाहीच्या धोरणांवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकरांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला

prakash ambedkar
पत्रकारांसमोरच प्रकाश आंबेडकरांनी वापरला अपशब्द (फाइल फोटो)

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या महितीपूर्ण वक्तव्यांसाठी आणि योग्य शब्दांमधील टीकेसाठी ओळखले जातात. मात्र शनिवारी सायंकाळी अमरावतीमध्ये एका पत्रकार परिषदेत केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या दडपशाहीच्या धोरणांबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरल्याचं पहायला मिळालं. भाजपाच्या धोरणांवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांनी आक्षेपार्ह भाषेत पत्रकारांसमोरच भाजपावर निशाणा साधला.

भाजपाच्या राजकारणासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकरांनी त्यावर प्रतिक्रिया देताना अपशब्द वापरला. “२०२४ पासून जेवढ्या निवडणुका झाल्यात तेव्हापासून त्यांचा ग्राफ हा स्थिर (हॉरीझॉण्टल) आहे तो वाढता (व्हर्टीकल) नाहीय. त्यांचा ग्राफ वाढत असता तर त्यांना मतांच्या टक्क्यांमध्ये मतदान वाढलं असतं,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी, “त्यांची जी वाढ झालीय ती झालीय. त्यात काही प्रश्न नाहीय. राहिला प्रश्न तो सत्तेमध्ये जाण्याचा. सत्तेत जाण्याचा मार्ग म्हणून ज्याला आपण निवडणूक म्हणतो. त्यात किती काम करतायं यापेक्षा क्वालिटेटीव्ह काम महत्वाचं आहे,” असं मत प्रकाश आंबेडकरांनी नोंदवलं.

राजकारणासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकरांनी, “दुसरा महत्वाचा भाग तुम्ही विरोधी पक्षाला दमण करताय का हा प्रश्न आहे. उद्या आम्ही समजा महाराष्ट्रात सत्तेत आलो. समजा भाजपाचे १०० प्रमुख कार्यकर्ते आहेत उद्या आम्ही त्यांना उचललं आणि तुरुंगात टाकलं तर सक्रीय कार्य होणार आहे का? तर नाही,” असं म्हणत राजकारण हे सकारात्मक असलं पाहिजे असं मत मांडलं.

भाजपाकडे अशा राजकारणाचा आभाव असल्याचं सूचित करताना प्रकाश आंबेडकरांनी आपल्यालाही ईडीची नोटीस आल्याचं म्हटलं. “तुम्ही (भाजपा) मोकळं वातावरण ठेवलेलं नाही. कोणी बोललं की ईडीची नोटीस दिली. माझ्यासारख्याला सुद्धा दिलेली आहे ना. पंतप्रधानांना मारण्याचं,” असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारवर टीका केली. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकरांनी अपशब्द वापरत ईडीच्या नोटीशीचा संदर्भ देत एक वक्तव्य केलं. “(ईडच्या नोटीशीनंतर) गां** दम असेल तर मला उचलून दाखवा असं म्हटलं होतं. काय होतंय ते बघा मग,” असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं.

“माझ्यासारखी जी ताकद आहे, मी बाबासाहेबांचा नातू असल्याने या भाषेत बोलू शकतो. पण सामान्य माणूस या भाषेमध्ये बोलू शकत नाही. याचाही आपण कुठेतरी विचार केला पाहिजे,” असं पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prakash ambedkar use foul language while criticizing bjp government scsg