scorecardresearch

अखेर ठरलं! गोव्यात प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्री; तर निवडणूक हरल्यानंतरही उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामींना संधी

गोवा आणि उत्तराखंडमधील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे.

देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुका झाल्या. १० मार्चला सर्व राज्यांचे निकाल लागले. त्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा झाली. परंतु गोवा आणि उत्तराखंडमधील नावं गुलदस्त्यात होती. या दोन्ही राज्यात भाजपा पक्षश्रेष्ठींकडून कोणाला संधी देण्यात येईल यासंदर्भात चर्चा सुरू होती. गोव्यात पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे प्रमोद सावंत यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार की नाही, याकडे लक्ष लागलं होतं. परंतु प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री असतील, तर उत्तराखंडमध्येही निवडणूक हरले असले तरी पुष्कर सिंह धामी यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपाने गोव्यात पुन्हा प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. पक्षाने पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आज झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर आणि एल मुरुगन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. सावंत दुसऱ्यांदा गोव्यात भाजपा सरकारचे नेतृत्व करणार आहेत. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर २०१९ मध्ये सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती.

दरम्यान, दुसरीकडे भाजपाने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची देखील घोषणा केली आहे. भाजपाने पुन्हा एकदा आपल्या जुन्या चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. उत्तराखंडमध्ये भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर धामी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीला नवनिर्वाचित आमदार तसेच उत्तराखंडसाठी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि पक्षाचे राज्याचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुष्कर सिंह धामी यांना खतिमा येथून पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या पराभवानंतर भाजपा आता दुसऱ्या कोणाला तरी मुख्यमंत्रीपद देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र सोमवारी पुन्हा एकदा धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pramod sawant for goa and pushakar singh dhami for uttarakhand bjp declares cm names hrc

ताज्या बातम्या