प्रसार भारतीला स्वायत्तता मिळणे नजीकच्या भविष्यात दृष्टिपथात नसले तरी आम्हाला त्या दृष्टिकोनातून पावले टाकावीच लागतील, असे प्रसार भारतीचे नवनियुक्त अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश यांनी येथे स्पष्ट केले.
प्रसार भारती हे स्वायत्त महामंडळ होते आणि त्यापासून मागे फिरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सूर्यप्रकाश यांनी येथे सांगितले. प्रेस क्लब ऑफ बंगळुरू आणि बंगळुरू रिपोर्टर्स गिल्डने आयोजित केलेल्या समारंभानंतर ते बोलत होते.
प्रसार भारतीमधील ९० टक्के कर्मचारी केंद्र सरकारचे आहेत तर माध्यमांचे काही प्रतिनिधी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले आहेत. जोपर्यंत ही व्यवस्था आहे तोपर्यंत प्रसार भारतीला स्वायत्तता मिळणे दृष्टिक्षेपात येणार नाही, मात्र आम्हाला त्या दिशेने पावले उचलावीच लागतील, असे ते म्हणाले.
दर्जाचा विचार करता आम्हाला व्यावसायितकेचा विचार करावा लागेल, आम्ही ते करू शकतो आणि आम्हाला तसा प्रयत्न करावाच लागेल, असेही सूर्यप्रकाश यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून बहुसंख्य खासगी वाहिन्या या वृत्तवाहिन्या न राहता त्यांचे स्वरूप गोंगाट करण्यासारखे झाले आहे. सध्या बातम्या नाही तर केवळ गोंगाटच ऐकावयास मिळतो, असेही ते म्हणाले. त्यामुळे नजीकच्या भविष्यात नसले तरीही प्रसारभारतीचे खासगीकरण होणार हे निश्चित असल्याचेच मानले जात आहे.