Prashant Kishor Bihar Jan Suraj performance in bihar assembly election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) दणदणीत विजय मिळवला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सत्ताधारी आघाडीने चांगली कामगिरी करत २४३ पैकी २०० हून अधिक जागा जिंकत मोठी मुसंडी मारली आहे. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा दारूण पराभव झाला आहे. विरोधकांना ४० ही संख्या देखील गाठता आलेली नाही. दरम्यान या निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी प्रशांत किशोर यांच्या जन सुरज पक्षाची चांगलीच चर्चा झाली होती. हा पक्ष निवडणुकीत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र निवडणूक निकालामध्ये जन सुराज पक्षाची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.

बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ची मतमोजणी सुरू झाल्याच्या ६ तसानंतरही जन सुराज पक्षाला एकाही जागेवर आघाडी घेता आली नव्हती. बहुतांश जागांवर पक्ष टॉप ३ मधून बाहेर होता. विशेष बाब म्हणजे प्रशांत किशोर यांच्या पक्षाने २००हून अधिक जागांवर निवडणूक लढवली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जन सुराज पक्षाला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी देखील दाखवली जात नव्हती.

‘नोटा’पेक्षाही खराब कामगिरी

जन सुराज पक्षाला त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत प्रभाव पाडण्यात अपयश आले आणि अनेक जागांवर पक्षाच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. २३८ पैकी बहुतेक उमेदवार डिपॉझिट गमावण्याच्या मार्गावर आहेत.

२३८ पैकी ६८ जागांवर नोटाला जनसुराज पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. प्रत्येक तीन जागांपैकी एका जागी पक्षाची कामगिरी नोटापेक्षा कमकुवत राहिली आहे. या आकडेवारीमुळे जनसुराज अशा पक्षांमध्ये सामील झाले आहेत ज्यांनी जास्त जागा लढवूनही खराब कामगिरी केली.

वोट शेअरच्या बाबतीत जन सुराजने बिहारमध्ये आपल्या पहिल्या निवडणुकीत सीपीआय(एमएल)(एल) (३.०५टक्के) आणि अनेक लहान पक्षांना मागे टाकले. जन सुराज पक्ष राज्यात मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत सातव्या स्थानावर राहिला. वोट शेअरमध्ये राजद (२२.७६ टक्के) सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपा (२०.८७ टक्के) दुसऱ्या क्रमांकावर होता. जेडीयू (१८.९१ टक्के) तिसऱ्या क्रमांकावर राहिला. शिवाय, काँग्रेसला ८.४६ टक्के मते मिळाली आणि चिराग पासवान यांच्या एलजेपी (आरव्ही) ला ५.११ टक्के मते मिळाली. अपक्षांचे मतांचे प्रमाण ४.६६ टक्के होते.

जन सूरजच्या पराभवाची ५ प्रमुख कारणे

  • प्रशांत किशोर स्वतः निवडणूक न लढवणे
  • काही काळानंतर प्रचार सुस्त पडला
  • कमकुवत संघटन
  • राज्यातील जातीय समीकरणे पक्षाच्या लक्षात आली नाहीत.
  • बहुतेक उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात

बिहारमध्ये कोण आघाडीवर?

बिहारमध्ये एनडीए सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार भाजपाच्या ९२ जागा आघाडीवर आहेत, जेडीयूच्या ८२ जागा आघाडीवर आहेत, आरजेडीच्या २५ जागा आघाडीवर आहेत. एलजेपीआरव्ही २१ जागा आघाडीवर आहेत. एमआयएमच्या ६ जागा आघाडीवर आहेत. कॉग्रेसच्या ६ जागां आघाडीवर आहेत. एसएएम पाच जागांनी आघाडी आहे.