निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना महागठबंधन सरकारवरुन मिश्किल टोला लगावला आहे. “आम्ही बिहारमध्ये अनेक युती बनताना आणि तुटताना पाहिल्या आहेत. मात्र, यातील एक युती कधीही तुटली नाही. कुठल्याही युती सरकारमध्ये बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आणि नितीश कुमार ही युती कायम राहिली. ही किमया फक्त तेच साधू शकतात. यासाठी फेविकॉलने त्यांना ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनवले पाहिजे”, असे प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातून शरद पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले…

काही महिन्यांआधी भाजपासोबत युती तोडल्यानंतर नितीश कुमार यांनी बिहारमध्ये काँग्रेस, डावे पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलासोबत महागठबंधन सरकार स्थापन केले आहे. या सत्तास्थापनेवरुन किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. राजदसोबत सत्ता स्थापनेच्याआधी अवघ्या काही महिन्यांपूर्वीच नितीश कुमार यांनी भाजपासोबत युती केली होती. मात्र, भाजपाकडून सहकार्य होत नसल्याचे कारण देत त्यांनी या युतीतून काढता पाय घेतला. बिहारमध्ये मित्रपक्ष बदलला असला तरी मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार हेच कायम आहेत.

“महाराष्ट्रात तमाशा…”, नाना पटोलेंची एकनाथ शिंदे सरकारवर आगपाखड, ‘त्या’ कार्यक्रमावरही तीव्र आक्षेप!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर यांनी बिहारच्या राजकीय परिस्थितीबाबत भाकित वर्तवले होते. “बिहारमधील नव्या युतीला जनतेचे समर्थन नाही. त्यामुळे पुढील निवडणुकांच्याआधी याही सरकारचे चित्र बदलेल”, असे किशोर म्हणाले होते. –