जनता, पंतप्रधान आणि संसद (पीपल, प्राइम मिनिस्टर अॅंड पार्लमेंट) या तिन्हींच्या सहकार्यानेच अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची निर्मिती केली जाईल असे विश्व हिंदु परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी म्हटले आहे. आज जमशेदपूरमध्ये एका कार्यक्रमानंतर त्यांनी हा थ्री पी फॉर्मुला सांगितला. या तीन ‘पी’ च्या माध्यमातून एक कायदा निर्माण केला जाईल आणि त्या द्वारेच राममंदिराचे निर्माण केले जाईल असे त्यांनी म्हटले. कुठल्याही परिस्थितीमध्ये राम मंदिराचा निर्माण केला जाईल असे ते म्हणाले. या मुद्दावर सर्वांशी सल्ला मसलत करुन निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.

याबरोबरच त्यांनी गोहत्या बंदी बाबत राष्ट्रीय स्तरावर समान कायदा आणला जावा असे म्हटले. देशामध्ये एक समान कायदा नाही त्यामुळेच सर्व तथाकथिक गोरक्षक हिंसा करत आहेत असे ते म्हणाले. जर समान कायदा आला तर गोरक्षकांना कायदा हातात घेण्याची गरजच उरणार नाही असे ते म्हणाले. देशातील अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी आहे. गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोवंश हत्येला बंदी आहे. नुकताच गुजरातने गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यामध्ये सुधारणा केली. गोहत्या करणाऱ्याला याआधी दहा वर्षांची शिक्षा होती. आता गोहत्या करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात येणार आहे.

कुलभूषण जाधव यांची सुटका करण्यासाठी भारताने आणखी जोर लावावा असे ते म्हणाले. कुलभूषण जाधव हे निर्दोष आहेत. त्यामुळे त्यांची सुटका ही लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले. अमेरिकेसोबत कसे राहावे याचा धडा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घ्यावा असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी धडक कारवाई करत आयसिसला वठणीवर आणले. त्यांच्याप्रमाणे भारताने देखील धडक कारवाई करावी असे ते म्हणाले.