सोमवारी संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या वडिलोपार्जित घराजवळ बॉम्ब फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच अनेक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. निवृत्त न्यायमूर्तीच्या घराजवळ एकापाठोपाठ दोन बॉम्ब फोडण्यात आले आणि नंतर आरोपींनी दुचाकीवरुन पळ काढला अशी माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती अशोक भूषण यांचा अयोध्येतील श्री राम मंदिराबाबत निर्णय सुनावण्यासाठी खंडपीठात समावेश होता.

यानंतर हाशिमपूर चौकापासून आजूबाजूच्या परिसरापर्यंत नाकाबंदी करून वाहनांचा शोध सुरू करण्यात आला. मात्र, बॉम्बस्फोट करणाऱ्यांना पकडता आले नाही. प्राथमिक तपासात सुतळी बॉम्बचा वापर दहशत पसरवण्यासाठी करण्यात आल्याचे उघड झाले. रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकारी आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे शोधत होते. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कोणीतरी फटाके फोडले होते.

नेमकं प्रकरण काय?

गुन्हे शाखा आणि कर्नलगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मिळून आरोपींची ओळख पटवली आहे. आरोपीविरुद्ध वेगाने बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, निवृत्त न्यायाधीश अशोक भूषण यांच्या वडिलोपार्जित घरासमोर चहाचा स्टॉल आहे. त्याच्यासोबत आरोपींचे काही कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादामुळे आरोपीला चहावाल्याला धमकावायचे होते. म्हणूनच त्यांनी त्याच्याभोवती स्फोट घडवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

बॉम्बचा आवाज येताच परिसरात दहशत पसरली आणि लोक घराबाहेर आले. पण तोपर्यंत आरोपी तिथून पळून गेले होते. भूषण कुटुंबाचे कोणाशीही वैर नाही. पण गेल्या काही दिवसांपासून काही लोक त्या परिसरात फिरत होते. घरात सुरू असलेल्या कामामुळे सध्या सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, त्यामुळे तो कॅमेऱ्यात कैद होऊ शकला नाही असे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले.

न्यायमूर्ती अशोक भूषण हे त्यांचे भाऊ आणि उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील अनिल भूषण यांच्या कुटुंबासह वडिलोपार्जित निवासस्थानी राहतात. घरात पेंटिंगचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. म्हणूनच सीसीटीव्हीचा डीव्हीआर बंद करण्यात आला. पण रस्त्यावर लावलेल्या कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि महत्त्वाचे माहिती हाती लागली. या आधारावर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.