पीटीआय, अयोध्या

प्राण प्रतिष्ठा सोहळय़ासाठी अयोध्येमध्ये एकीकडे तयारी पूर्ण झाली असताना, संपूर्ण शहर रामाच्या रंगात रंगले आहे. एकीकडे शहरामध्ये भाविक पूजा प्रार्थना करत आहेत तर विविध कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून रामभक्ती सादर करत आहेत. त्याचवेळी येणाऱ्या पाहुण्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने तयारी केली आहे. सुरक्षेसाठी साध्या कपडय़ातील पोलीस, ड्रोन, एनडीआरएफच्या तुकडय़ा सज्ज आहेत. दुसरीकडे भाविकांसाठी गरम भोजनव्यवस्था ते वाहतूक सुरळीत राहावी यासाठी हजारो वाहनांच्या पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. शहर सजले आहेच, त्याबरोबर मंदिरालाही फुले आणि दिव्यांची सजावट करण्यात येत आहे. प्राण प्रतिष्ठा सोहळय़ाच्या आदल्या दिवशी मंदिराच्या आतील भागाची काही छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली.

राम मंदिराची झलक

राम मंदिराच्या आतील बाजूंची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली. मंदिराची भव्यता आणि सौंदर्य याची त्यामधून कल्पना येते. फुलांची आकर्षक सजावट आणि सुरेख रोषणाई यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

हेही वाचा >>>“तमिळनाडूतल्या श्रीरामाच्या मंदिरांमध्ये भजन-किर्तनास आणि अयोध्येतल्या कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी”, सीतारममण यांचे गंभीर आरोप

असे आहे मंदिर

पारंपरिक ‘नगाडा शैली’मध्ये बांधलेले मंदिर पूर्व-पश्चिम दिशेला ३८० फूट लांब, २५० फूट रुंद आणि १६१ फूट उंच आहे. प्रत्येक मजला २० फूट उंच असेल. मंदिरात ३९२ स्तंभ व ४४ दरवाजे असतील. मंदिरामध्ये पूर्वेकडून प्रवेश दिला जाईल आणि दक्षिणेकडून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. संपूर्ण मंदिर तीन मजली आहे, मुख्य मंदिरात पोहोचण्यासाठी भाविकांना ३२ पायऱ्या चढून जावे लागेल.

कलाकारांचा मेळा

अयोध्येमध्ये विविध प्रकारच्या कला सादर करणाऱ्या कलाकारांची अनेक पथके जमली आहेत. ‘बधवा’ ते ‘घुमर’ अशा विविध प्रकारची लोकनृत्ये सादर केली जात आहेत. राम, सीता आणि हनुमानाचे पोशाख केलेले कलाकार सर्वत्र दिसत आहेत. रामस्तुती करणारी लोकगीतेही सादर केली जात आहेत. शहरात ठिकठिकाणी लहान व्यासपीठे उभारण्यात आली आहेत. त्यावर देशभरातून आलेले कलाकार आपापली कला सादर करत आहेत.

हेही वाचा >>>पाच महिने तुरूंगात, घरावर बुलडोझर चालवला; प्रत्यक्षदर्शीनं साक्ष बदलली अन् १८ वर्षीय मुस्लीम तरूणाला जामीन मिळाला

अर्धी किंवा पूर्ण सुट्टी

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा, आसाम, छत्तीसगड, गोवा, ओडिशा, हरियाणा, झारखंड या राज्यांनी अर्धी किंवा पूर्ण सुट्टी जाहीर केली आहे. तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीही अर्धी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काही राज्यांनी एक दिवसाची दारूबंदी जाहीर केली आहे, तर गोव्याने आठ तास कॅसिनो बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हजारो वाहनांसाठी पार्किंगची सोय

अयोध्येमध्ये हजारोंच्या संख्येने येणारे निमंत्रित आणि भाविक लक्षात घेऊन पार्किंगचीही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शहरात वाहनांची ये-जा सुरळीतपणे व्हावी यासाठी राज्य सरकारने ५१ ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे. तिथे २२ हजार ८२५ वाहने उभी करता येतील. सुरक्षेसाठी तिथे ड्रोनद्वारे टेहेळणी केली जाईल, तसेच गुगल मॅपचा वापर केला जाईल.

सुरक्षेसाठी एआयची मदत

प्राण प्रतिष्ठा सोहळय़ासाठी अयोध्येमध्ये बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि हवाई टेहेळणीसाठी ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. हे कॅमेरे आणि ड्रोन लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवतील. ‘स्पेक्ट्रोमीटर वेव्हलेंग्थ डिटेक्शन’ यासारख्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेले भूसुरुंगविरोधी ड्रोन जमिनीखालील स्फोटकांचा शोध घेतील. त्याशिवाय मंदिर परिसरात साध्या पोशाखांमध्ये पोलीस उपस्थित असतील.

हेही वाचा >>>राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनंतर काय होणार? बांधकाम पूर्ण होण्याबाबत अध्यक्षांनी दिली माहिती

प्रशासन सज्ज

अयोध्येतील धर्म पथ ते राम पथ या मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. हनुमान गढी आणि अशर्फी भवन या भागांमध्ये पोलीस रस्त्यांवर गस्त घालत आहेत. उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकानेही अयोध्येत गस्त घातली आहे. रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी हल्ले, बुडण्याच्या घटना आणि भूकंपासारख्या आपत्तींचा सामना करण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या विविध तुकडय़ांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच आरोग्याशी संबंधित आपत्कालीन प्रसंग घडले तर त्यासाठीही प्रशासनाने तयारी केली आहे. शरयू नदीच्या पात्रात आणि किनाऱ्यावरही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

’  अयोध्येतील पूर्वीच्या राजाचे निवासस्थान असलेले राज सदन, विविध मंदिरे आणि इतर इमारतींवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

’  दिल्लीमधील महत्त्वाची मंदिरे आणि बाजारपेठांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

’  गोव्यातील सर्व कॅसिनो सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत बंद राहतील असे कॅसिनो कंपनीच्या व्यवस्थापकांनी जाहीर केले आहे.

’  एकूण ६० देशांमधील वॉशिंग्टन डीसी, पॅरिस, सिडनी यासारख्या विविध शहरांमध्ये विश्व हिंदी परिषदेने किंवा स्थानिक हिंदी गटांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.