पीटीआय, नवी दिल्ली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी गौरव केला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशासह देशाची एकता आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढीस लागण्यावर भर दिला.

राष्ट्रपती मुर्मू यांनी पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भ्याड आणि अमानवी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि ‘संरक्षण दलांनी सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यासाठी सामरिक स्पष्टता आणि तांत्रिक क्षमतेचे दर्शन घडवले,’ असे वक्तव्य केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवादविरोधातील लढाईमध्ये मैलाचा टप्पा असल्याचे त्या म्हणाल्या.

मुर्मू म्हणाल्या, ‘मानवतेचा दहशतवादाविरोधातील लढा अशी ‘ऑपरेशन सिंदूर’ची नोंद इतिहासात होईल. ‘राष्ट्रीय ऐक्य’ हेच योग्य प्रत्युत्तर देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रभावी ठरते. जगाने भारताच्या भूमिकेची दखल घेतली आहे. आपण आक्रमक नाही. पण, देशातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी प्रतिहल्ला करण्यास आम्ही कसूर करणार नाही, हे जगाला समजले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या यशस्वीपणाचे साक्षीदार ठरले. आपण सुरक्षेच्या बाबतीत लागणाऱ्या अधिकाधिक गरजा भागविण्यासाठी आत्मनिर्भर होण्याइतक्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो आहोच. स्वातंत्र्यानंतर प्रथमच असे होत आहे. आपण, योग्य मार्गावर आहोत, हे अंतिमतः स्पष्ट झाले.’

राष्ट्रपतींनी उत्तम प्रशासन आणि भ्रष्टाचारशून्य कारभाराचा उल्लेख केला. भ्रष्टाचार दूर करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वदेशी उत्पादन खरेदी आग्रह धरतानाच त्यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचा, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रांचाही आढावा घेतला. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पुढील टप्पा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असल्याचे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या…

– देशातील जवळपास सर्व गावांत ४ जी मोबाइलने संपर्क प्रस्थापित. उर्वरित गावांत लवकरच सुविधा. यामुळे डिजिटल पेमेंट सुविधेचा विस्तार.

– लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम देण्याच्या (डीबीटी) सोयीचे कौतुक. जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी निम्मे भारतात.

– आयुष्मान भारत योजनेमुळे आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल. ५५ कोटींहून अधिक नागरिकांचा या योजनेंतर्गत समावेश.

– आज (१४ ऑगस्ट) विभाजन विभिषिका स्मृती दिवस आहे. फाळणीमुळे मोठ्या हिंसेला सामोरे जावे लागले. लक्षावधी नागरिकांचे विस्थापन झाले.