देशाचा इतिहास आणि परंपरेने असहिष्णुतेपेक्षा वादविवादात्मक भारतीयास पसंत केले आहे. त्यामुळे लोकांनी असहिष्णुतेस थारा देऊ नये, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी येथे केले.
आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. असहिष्णुता अमान्य करताना कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये, असे ते म्हणाले. अलीकडेच पेंग्विनने वादग्रस्त पुस्तक मागे घेतल्याचा नामोल्लेख टाळून घटनेने प्रत्येकाला भाषणस्वातंत्र्य बहाल केले असून त्याचा आदर राखला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. द्वेषमूलक, असहिष्णुता आणि पूर्वग्रहदूषित मते फेटाळताना कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये, असे मुखर्जी यांनी नमूद केले. भारताची परंपरा आणि इतिहासानेही असहिष्णुतेपेक्षा वादविवादपटू भारतीयाचा पुरस्कार केला आहे आणि अशा प्रकारच्या पुस्तक मेळाव्यांमधून आपल्याला याचे स्मरण होते, याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले.
आपल्या देशात विविध आचारविचार व तत्त्वज्ञानाची शतकानुशतके स्पर्धा झाली असून भाषणस्वातंत्र्य हा सर्वात महत्त्वाचा मूलभूत हक्क आपल्याला घटनेने बहाल केला असल्याचे प्रतिपादन मुखर्जी यांनी केले.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात ‘कथासागर’ या कल्पनेच्या आधारे बालसाहित्याचा पुरस्कार करण्याच्या विचाराचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. मुलांना ढोंगाचा राग असल्यामुळे मुले सर्वोत्तम वाचक असतात, असे राष्ट्रपती म्हणाले.