झाशी : उत्तरप्रदेशातील बुंदेलखंडच्या मागास भागाच्या वाढीला चालना देण्यासाठी ३,४२५ कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले किंवा शिलान्यास केला.

निवडणुकीला सामोरे जाणार असलेल्या उत्तरप्रदेशातील झाशी येथे झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी ६०० मेगावॅटच्या अल्ट्रा मेगा सौरऊर्जा पार्कचे भूमिपूजन केले. ३०१३ कोटी रुपयांहून अधिक खर्चाने उभारल्या जाणाऱ्या या पार्कमुळे स्वस्त दरात वीज पुरवणे शक्य होणार आहे.

उत्तरप्रदेश संरक्षण उद्योग कॉरिडॉरच्या झाशी नोडमध्ये पंतप्रधानांनी ४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचाही शिलान्यास केला. रणगाडाविरोधी दिशादर्शक क्षेपणास्त्रांसाठी प्रणोदन प्रणाली (प्रॉपल्शन सिस्टिम) तयार करण्यासाठी संयंत्र उभारण्याकरता भारत डायनामिक्स लि. तर्फे हा प्रकल्प अमलात आणला जाणार आहे.  मोदी यांनी झाशीत अटल एकता पार्कचेही उद्घाटन केले.