पीटीआय, वाराणसी
जागतिक आर्थिक अनिश्चितता असल्याने नागरिकांनी ‘स्वदेशी’चा स्वीकार करावा आणि स्थानिक पातळीवर तयार झालेल्या उत्पादनांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. देशाची खरी सेवा स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देण्यात आहे, असेही त्यांनी सांगितले.
वाराणसी येथे पंतप्रधानांनी दोन हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसेच देशभरातील ९.७० कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २०,५०० कोटी रुपयांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता वितरित केला. त्यावेळी स्वदेशी उत्पादनांच्या वापरावर पंतप्रधानांनी भर दिला. अमेरिकेने भारतावर आयात शुल्क लादल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची अर्थव्यवस्था मृतवत असल्याचा उल्लेख केला होता. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ही भूमिका घेतली. जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेला तोंड देत आहे. अशा परिस्थितीत सर्वच देश स्वहित जोपासण्याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहेत. भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे आपल्या आर्थिक प्राधान्याबाबत खबरदारी बाळगायला हवी असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना व्यापाऱ्यांनी केवळ स्थानिक वस्तूंची विक्री करण्याची शपथ घ्यावी. तसेच ग्राहकांनीही खरेदी करताना ते देशातच उत्पादित झाले आहे काय? याचा जरूर विचार करावा. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
‘काँग्रेसकडून सैन्याच्या शौर्याचा अपमान’
‘ऑपरेशन सिंदूर’ने जगाला देशाची ताकद दाखवून दिली आणि जो कोणी भारतावर हल्ला करण्याचे धाडस करेल, त्याला अगदी पाताळात असला तरी सोडले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला, असे पंतप्रधानांनी सांगितले. काँग्रेसने सशस्त्र दलांच्या शौर्याचा वारंवार अपमान केला असून ‘ऑपरेशन सिंदूर’चा तमाशा म्हणून उल्लेख केल्याचा आरोप त्यांनी केला.