पीटीआय, नवी दिल्ली
तुमच्या भूमीवरून दहशतवाद सुरूच राहिला, तर प्रत्युत्तर जरूर देऊ, असा स्पष्ट आणि ठाम संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला मंगळवारी दिला. मोदी म्हणाले, ‘दहशतवादाविरुद्ध भारताची लक्ष्मण रेषा स्पष्ट आहे. ‘भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर एकच परिणाम होतो, तो म्हणजे विनाश आणि संपूर्ण विनाश,’ या शब्दांत मोदींनी पाकिस्तानला खडसावले.
पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली. त्या वेळी भारताची अभेद्या अशी हवाई संरक्षण प्रणाली एस-४०० त्यांच्या पाठीमागे होती. पाकिस्तानने ही प्रणाली उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता.
आता कुठलाही दहशतवादी हल्ला झाला, तर भारत प्रत्युत्तर देईल. नक्की प्रत्युत्तर देईल, असे पंतप्रधानांनी हवाई दलाच्या तळाला भेट दिल्यानंतर नमूद केले.
मोदी म्हणाले, ‘हा नवा भारत आहे. या भारताला शांतता हवी आहे. पण, मानवतेवर हल्ला केला, तर शत्रूला रणांगणात चीत कसे करावे, हेही आम्हाला ठाऊक आहे. ऑपरेशन सिंदूर सामान्य मोहीम नव्हती. भारताच्या धोरणाची, हेतूची (पान ८ वर)(पान १ वरून) आणि निर्णायक क्षमतेची ती फलश्रुती होती. हा देश शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धांचा आहे आणि गुरू गोविंदसिंगांचाही आहे. शत्रूविरोधात त्यांनी शीखांची सेना उभारली.’
‘‘धर्म’ (सदाचरण) स्थापना करण्यासाठी हातामध्ये शस्त्रे घेण्याची भारताची परंपरा आहे. आपल्या बहिणींचे, मुलींचे सिंदूर जेव्हा पुसले गेले, तेव्हा आपण दहशतवाद्यांना ते लपले होते तेथे जाऊन मारले. दहशतवाद्यांना वाटते, की त्यांना पाकिस्तानी लष्कराचे संरक्षण आहे. भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाने त्यांची हवा काढून घेतली. पाकिस्तानात अशी एकही जागा नाही, की जिथे दहशतवाद्यांना सुरक्षित वाटेल. आपण त्यांना त्यांच्या अड्ड्यावर जाऊन मारू. कुठेही पळून जाण्याची संधी त्यांना देणार नाही,’ असे मोदी म्हणाले.
अन् मोदींचे आदमपूर तळावर आगमन…
पंतप्रधान मोदी यांची या तळावरील भेटीची कुठलीही औपचारिक घोषणा नव्हती. ते आल्यानंतर जवानांनी ‘भारत माता की जय’चा जयघोष केला. त्यानंतर जवानांशी संवाद साधला. त्या वेळी एस-४०० यंत्रणा त्यांच्या मागे होती. पश्चिम हवाई कमांडची टोपी पंतप्रधानांनी घातली होती. पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताचे ‘न्यू नॉर्मल’ असल्याचा या वेळी पुनरुच्चार केला आणि संरक्षण दलांनी जे साध्य केले, त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचे वक्तव्य केले.
भेटीसाठी आदमपूर हवाई तळच का?
पाकिस्तानी सीमेपासून १०० किमी अंतरावर पंजाबमधील आदमपूर हवाई तळ आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा हा तळ आहे. पाकिस्तानने हा तळ आणि एस-४०० क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. पंतप्रधानांनी या तळाला भेट दिल्यामुळे पाकिस्तानचे दावे फोल ठरले.
पाकिस्तानी अधिकाऱ्याची हकालपट्टी
भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालय कार्यालयातील अधिकाऱ्याच्या हकालपट्टीचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या पदाला साजेसे नसणारे वर्तन केल्याबद्दल ही कारवाई केली जात असून त्यांना २४ तासांच्या आत देश सोडायला सांगण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. पाकिस्तानच्या स्थायी कार्यदूतांनाही या कारवायांबद्दल माहिती देण्यात आली आहे.
काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार
श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर शाहीद कुट्टी मारला गेला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या चकमकीत एकूण तीन अतिरेकी ठार झाल्याचे त्यांनी सांगितले. शोपियां जिल्ह्याच्या शुक्रू केल्लेर भागात काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांनी उत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. हे सर्व लष्कर-ए-तय्यबाचे होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पंतप्रधान म्हणाले…
● ‘भारत माता की जय’ ही फक्त घोषणा नसून, देशासाठी आपले आयुष्य समर्पित करण्यासाठी जवानांनी घेतलेली ती प्रतिज्ञा आहे.
● ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जवानांचे शौर्य इतिहासात कायमस्वरूपी कोरले गेले आहे.
● अण्वस्त्राची भीती दाखवण्याच्या प्रयत्नांची हवा संरक्षण दलांनी काढून घेतली.