पीटीआय, कोलकाता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सशस्त्र दलांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच, राष्ट्रबांधणीत सुरक्षा दलांचे योगदान पंतप्रधानांनी अधोरेखित केले. संरक्षण मंत्रालयाने या बाबतीत निवेदन प्रसिद्ध केले.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोमवारी लष्कराच्या पूर्व कमांडच्या मुख्यालयात संरक्षणाशी संबंधित संयुक्त प्रमुखांच्या परिषदेचे (कंबाइंड कमांडर्स कॉन्फरन्स) उद्घाटन केले. या वेळी त्यांनी ‘इंडियन आर्मड फोर्सेल व्हिजन २०४७’चे अनावरण केले. भविष्यातील सैन्यदले कशी असतील, याचा आढावा यामध्ये घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावर अशा प्रकारची परिषद होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह हेदेखील परिषदेला उपस्थित होते. संरक्षणमंत्र्यांसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि तिन्ही सुरक्षा दलांचे प्रमुख परिषदेला उपस्थित होते.

ही परिषद दोन वर्षांतून एकदा होते. यापूर्वी २०२३ मध्ये भोपाळ येथे ही परिषद झाली होती. परिषदेत नागरी स्तरावरील आणि संरक्षण दलांतील असे सर्व वरिष्ठ एकत्र येऊन देशाच्या सुरक्षेवर चर्चा करतात. उच्च अधिकाऱ्यांचे परिसंवाद येथे होतात. यंदाची परिषद ही १६ वी असून त्यामध्ये संरक्षण दलांतील आगामी सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ‘वर्ष सुधारणांचे – बदल भविष्याचे’ ही यंदाच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे.