दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज (दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. शुक्रवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने झालेल्या दरियागंज येथून रामलीला मैदान अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर असल्याने मोदींच्या सभेसाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. याच सभेत मोदी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या सभेत मोदी हे देशभरात तापलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत बोलणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील 1734 अवैध वसाहती वैध करण्यासाठीच्या मुद्द्यावर भाजपाकडून सकाळी ११ वाजता रामलीला मैदानात ‘धन्यवाद’ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. जवळपास दोन लाखांपर्यंतची गर्दी या सभेला जमण्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्लीत शुक्रवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या निदर्शनानंतर हिंसाचार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, तसेच जामियामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही सभा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

दरम्यान, शनिवारी पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. ही बैठक तब्बल साडे आठ तास सुरु होती. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत मंत्रालयांना सादरीकरण करण्यास सांगण्यात आले होते. सरकारने जे निर्णय घेतले होते त्यांच्या अंमलबजावणीसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या तसेच नावीन्यपूर्ण कोणते उपक्रम राबवण्यात आले याचा आढावा या वेळी घेण्यात आला. सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी या मुद्दय़ांवरून देशभरात आंदोलन सुरू असताना मंत्रालयांच्या कामगिरीची झाडाझडती घेण्यात आली. मोदी सरकारच्या गेल्या सहा महिन्यांच्या कार्यकाळातील ही दुसरी बैठक घेण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi to address a rally at ramlila maidan in delhi security tightened sas
First published on: 22-12-2019 at 08:39 IST