लोकसभा निवडणुकीत छडी घेऊन यूपीए सरकारच्या मागे लागलेल्या मोदी गुरूजींनी शुक्रवारी देशातील विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेमळ आणि खेळीमेळीच्या वातावरणात ‘दशपाठ’ शिकवले. शिक्षकदिनानिमित्ताने देशभरातील विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याचा, वाचन करण्याचा, तंत्रज्ञानाने अवगत होण्याचा सल्ला दिलाच; शिवाय येत्या काळात आपल्या सरकारचा प्रमुख मुलींच्या शिक्षणावर असेल, असेही जाहीर केले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी पंतप्रधानांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मोदींचे भाषण ऐकण्याची सक्ती, त्यावरून निर्माण झालेले वादंग या पाश्र्वभूमीवर झालेला हा पंतप्रधान-विद्यार्थी संवाद मात्र चांगलाच रंगला. नवी दिल्ली येथील माणेकशॉ सभागृहात पंतप्रधानांनी सुमारे अर्धा तास विद्यार्थ्यांना संबोधून भाषण केले. त्यात त्यांनी मुलांना वाचन, शिक्षण, खेळ, स्वच्छता अशा अनेक गोष्टींचे महत्त्व पटवून दिले. देशात सध्या शिक्षकांचा तुटवडा आहे. शिक्षण ही एक अशी चळवळ झाली पाहिजे की त्यामुळे ही परिस्थिती बदलून आपल्याला जगभर शिक्षक निर्यात करता आले पाहिजे, असे मोदी म्हणाले.
मुलींच्या शिक्षणावर भर
अधिकाधिक मुलींनी शिक्षण घ्यावे याला आपले सरकार प्राधान्य देत असल्याचे मोदी म्हणाले. शालेय शिक्षण सोडून देण्याचे मुलींचे प्रमाण कमी व्हावे यासाठी घराजवळच शाळा सुरू करण्याची सरकारची योजना असून त्या संदर्भात सर्व राज्य सरकारांशी चर्चा सुरू असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. देशभरातील सर्व शाळांमध्ये मुलींसाठी प्रसाधनगृहे उभारण्याच्या योजनेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.   
मी टास्कमास्टर
मोदींनी स्वत:चे वर्णन ‘टास्कमास्टर’ असे केले. कोणत्याही कामात झोकून देणे हा आपला स्वभाव असून इतरांनाही त्याच पद्धतीने काम करण्यासाठी प्रेरित करतो, असे मोदींनी स्पष्ट केले.
“सर्व सुशिक्षित, डॉक्टर-अभियंते, नोकरशहा यांनी आठवडाभरात किमान एक तास तरी आपल्या नजीकच्या शाळेत जाऊन मुलांना शिकवावे. त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व वृद्धिंगत तर होईलच, शिवाय शिक्षण ही एक जनचळवळ म्हणून पुढे येईल व राष्ट्र उभारणीसाठी त्याचा उपयोग होईल.”
  -नरेंद्र मोदी, पंतप्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्यारे   विद्यार्थी   एवम्   दोस्तों
*मुलगी शिकल्याने दोन कुटुंबे शिकतात. मुलींचे शिक्षण ही सरकारची प्राथमिकता आहे.
*तुमच्यातले लहान मूल सदैव जिवंत ठेवा.
*राजकारण ही सेवा आहे. यात असलेल्या प्रत्येकाने आपल्या कुटुंबाप्रमाणे जनतेची सेवा केली पाहिजे.
*विद्यार्थ्यांमधील छुपे गुण हेरणे, हेच शिक्षकाचे काम आहे.
*काही तरी बनण्याचे स्वप्न पाहण्याऐवजी काहीतरी करण्याचे स्वप्न बघा.
*इतके खेळा की दिवसातून चारवेळा घाम निघाला पाहिजे. खेळ नसेल तर मुले बहरूच शकणार नाहीत.
*‘गुगलगुरू’ माहिती देईल; पण ज्ञान देऊ शकणार नाही.
*तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींची चरित्रे वाचा.
*आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी अवगत व्हा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modis speech on teachers day
First published on: 06-09-2014 at 03:30 IST