पंतप्रधानांच्या सभेची जय्यत तयारी

पिंपळगाव येथे होणाऱ्या सोमवारी सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या जाहीर सभेसाठी तीन लाख चौरस फूट आकाराचा मंडप उभारून येणार आहे. मंडपात बसण्यासाठी एक लाख खुर्च्याची व्यवस्था करण्यात येणार असून पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावरील विस्तीर्ण शेतजमिनीवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात मंडप उभारणीचे काम सुरू आहे. पासधारक कामगार वगळता या ठिकाणी अन्य कोणालाही प्रवेश देण्यात येत नसून सभा स्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर महाराष्ट्रात पंतप्रधानांची पहिलीच सभा कृषिमाल उत्पादनाचे केंद्र असलेल्या पिंपळगाव येथे होत आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे आमदार अनिल कदम, भाजपचे पदाधिकारी तयारीची धुरा सांभाळत आहेत. बाजार समिती कार्यालयालगतच्या जॉइंट फार्मिग सोसायटीच्या विस्तीर्ण परिसरात ही सभा होणार असून सभेसाठी मंडप उभारणी आणि इतर तयारी बंदोबस्तात सुरू आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची सभा असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दक्षता बाळगली जात असून मंडप उभारणीचे काम करणाऱ्या कामगारांना पोलीस यंत्रणेने विशेष पास दिले आहेत. त्याव्यतिरिक्त पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांच्या उपस्थितीत परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पिंपळगाव ग्रामपंचायत अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना पास देऊन सभास्थानी दक्षतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. बंदोबस्तावरील पोलिसांसाठी शुद्ध पाणी, भोजनाची व्यवस्था सभास्थळीच करण्यात आली आहे. सभास्थळी प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची तपासणी करून प्रवेश देण्यात येणार असून व्यासपीठ परिसरात पास असल्याशिवाय कोणालाही जाता येणार नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या जाहीर सभेद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा सेना-भाजपचा प्रयत्न असल्याचे आमदार कदम यांनी सांगितले. दरम्यान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील प्रचारसभेच्या जागेची एक-दोन दिवसात पंतप्रधान कार्यालयातील पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्थळाचे अवलोकन होईल. सुरक्षा आणि इतर बाबींबाबत गरज वाटल्यास पथकाकडून सूचनाही केल्या जातील असे सांगण्यात आले.

प्रशासनाला आंदोलनाची धास्ती

ज्या भागात जाहीर सभा होत आहे, तो परिसर शेतकरी आंदोलनाची भूमी म्हणून ओळखला जातो. कृषिमालाचे उत्पादन करणारा हा संपूर्ण परिसर आहे. पाच वर्षांत कृषिमालास समाधानकारक भाव मिळाला नसल्याने शेतकरी वर्गाने अनेकदा आंदोलनातून अस्वस्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाला आंदोलनाची धास्ती वाटत असून पंतप्रधानांसमोर कोणतेही आंदोलन होऊ नये त्या दृष्टीने प्रशासन खबरदारी घेत आहे. शेतीशी निगडित प्रश्नांवर पंतप्रधान काय बोलतात याकडे समस्त  शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.