लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधीची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पक्षातील कार्यकर्ते प्रियंका गांधी यांनी सक्रीय राजकारणात यावे, अशी मागणी करत होते. आता प्रियांका यांना औपचारिकरित्या पक्षात पद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या नियुक्तीनंतर प्रियंका तसेच राहुल गांधींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही प्रियांका गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांका या २१ व्या शतकातील इंदिरा गांधी असल्याचं सांगताना शिंदे यांनी आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसचाचा विजय होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियंका यांना पक्षात पद दिले आहे. प्रियंका पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदीचा पदभार फेब्रुवारीपासून स्वीकारतील. या नियुक्तीबद्दल बोलताना शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘२० व्या शतकात इंदिरा गांधी होत्या तशाच २१ शतकात प्रियांका गांधी आहेत. इंदिरा गांधींनी ज्याप्रकारे उत्तर प्रदेश जिंकला त्याचप्रमाणे प्रियांकाही जिंकणार,’ असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

निवडणुकांआधीच प्रियांकांना पद दिल्यानंतर भाजपा यावर टीका करणार हे सहाजिक आहे. पण ते जास्त महत्वाचे नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. ‘आम्ही बऱ्याच काळापासून प्रियांका गांधी राजकारणात येण्याची वाट पाहत होतो अखेर आज त्याची घोषणा झाली. प्रियांकांच्या नियुक्तीमुळे केवळ पूर्व उत्तर प्रदेश नाही तर संपूर्ण राज्यात याचा परिणाम जाणवेल,’ असंही शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

प्रियंका गांधी या निवडणुकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रचार करायच्या. मात्र, त्यांच्याकडे पक्षात कोणतेही पद नव्हते. गेल्या काही वर्षांपासून प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाची धूरा सोपवण्याची मागणी केली जात होती. ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते.

प्रियंका गांधींसह ज्योतिरादित्य सिंधिया यांची उत्तर प्रदेश पश्चिममधील महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच के सी वेणुगोपाल यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi is indira gandhi of 21st century sushilkumar shinde
First published on: 23-01-2019 at 18:12 IST